"बिद्री'ने दिवसभर अनुभवली ईर्षा अन्‌ तणाव 

दत्तात्रय वारके 
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

बिद्री - येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज कार्यक्षेत्रातील सर्वच गावांत तणावपूर्ण वातावरण, ईर्षा आणि चुरशीने मतदान पार पडले. कार्यकर्ते, उमेदवारांसह नेत्यांची धावाधाव, अतिसंवेदनशील केंद्रामुळे मतदान केंद्रांना आलेले पोलिस छावणीचे स्वरूप, प्रत्येक मतासाठी चाललेली चढाओढ यामुळे संपूर्ण कार्यक्षेत्र दिवसभर ढवळून निघाले. मतदानानंतर कार्यकर्ते मतांच्या आकडेमोडीत गुंग असून आता सर्वांच्याच नजरा मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. 

सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. उत्पादक व राखीव गटातील मिळून 11 मतपत्रिका मतदारांना दिल्या जात होत्या. यापैकी प्रत्येक मतदाराला 20 मते देण्याचा अधिकार होता. त्यामुळे एका मतदाराला 15 मिनिटे वेळ लागत होता. दुपारी 12 पर्यंत मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसत होत्या. परिसरात झालेल्या पावसाने शेती कामे खोळंबल्याने सभासदांनी मतदानास पसंती दिल्याने दुपारपर्यंत बहुतांश केंद्रावर सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत 75 टक्के मतदान झाले होते.

संस्था गटातील मतदान बिद्री कारखाना परिसरातील शाळेत तीन केंद्रावर घेण्यात आले. या वेळी महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार जगदीश पाटील व शाहू आघाडीचे उमेदवार जीवन पाटील सभासदांच्या स्वागतासाठी प्रवेशव्दारावरच उभे होते. या गटात काटा लढत असल्याने केंद्रावर प्रचंड तणाव दिसत होता. बहुतांशी प्रमुख नेते व त्यांचे कार्यकर्ते हे संस्थेचे ठरावधारक असल्याने दिवसभरात अनेक मान्यवरांनी या केंद्राला भेट देऊन मतदानाचा अधिकार बजावला. 

कागल तालुक्‍यातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या बोरवडे केंद्रावर सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दिवसभरात या केंद्रावर कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत होती. आजच्या मतदानावेळी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गाड्या, मोटारसायकली याव्दारे मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार गणपतराव फराकटे, शाहू आघाडीचे उमेदवार बालाजी फराकटे यांनी येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात या केंद्राला आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, हमिदवाडा कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक, सुनील सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी भेटी दिल्या. 

परिसरातील बिद्री, उंदरवाडी, फराकटेवाडी, वाळवे खुर्द या ठिकाणीही मोठ्या चुरशीने किरकोळ प्रकार वगळता शांतेत मतदान झाले. 

Web Title: Kolhapur news Bidri Sugar Factory Election