खंडणीसाठी गारमेंट उद्योजकाचे इचलकरंजीत अपहरण

राजेंद्र होळकर
मंगळवार, 12 जून 2018

इचलकरंजी - एक कोटीच्या खंडणीसाठी येथील नाकोडा नगरातील एका गारमेंट उद्योजकांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. पाच अनोळखी व्यक्तिंनी काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास मारहाण करत उद्योजकाचे अपहरण केले.

इचलकरंजी - एक कोटीच्या खंडणीसाठी येथील नाकोडा नगरातील एका गारमेंट उद्योजकांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. रामकृष्ण रामप्रताप बाहेती (रा. नाकोडानगर, इचलकरंजी) असे त्या उद्योजकांचे नाव आहे. पाच अनोळखी व्यक्तिंनी काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास मारहाण करत  या उद्योजकाचे अपहरण केले.

अपहरणकर्त्यांनी उद्योजकास मोटारी बसवून रात्री उशिरापर्यंत शहापूर, हातकणंगले, पेठवडगांव, कुभोज परिसरात फिरविले. मध्यरात्रीच्या सुमारास समोरुन गस्तीची पोलीस गाडी येत असल्याचे पाहुन अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना पेठवडगांव परिसरात सोडून पलायन केले. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.

अपहरणकर्त्यांनी रामकृष्ण यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन, हातातील दोन तोळ्याची अंगठी, मोबाईल हॅडसेट असा 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे पोलिस तक्रारीमध्ये म्हटले आहे. बाहेती यांचा येथील निरायम हॉस्पीटलसमोर आदित्य गारमेंट्‌स नावाचा रेडीमेड कापड तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून ते काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मोपेडवरुन घरी जात होते. ते घराशेजारी आले असता त्यांच्या समोर सिल्वर रंगाची एक मोटार येवून थांबली. त्यामुळे उद्योजक श्री. बाहेती यांनी मोपेड रस्त्यावर थांबविली. याचवेळी त्यांच्या मागून दोन आणि शेजारच्या लोटस मंदीराकडून दोन अशा चार अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी बाहेती यांना मारहाण करीत मोटारीत जबरदस्तीने बसविले. अपहरणकर्त्यानी मुलाला फोन करुन एक कोटी रुपये मागवून घे, नाही तर तुला जीवंत सोडणार नसल्याबाबतची धमकी दिली. 

हातकणंगलेहून गस्तीची पोलीस गाडी पेठवडगावकडे येत असलेली अपहरणकर्त्यांना दिसली. त्यामुळे बाहेती यांना वाटेत सोडून अपहरण करणाऱ्या व्यक्तींनी पलायन केले. त्यानंतर बाहेती यांनी पोलिस गाडीला हात करुन थांबविले. गाडीतील पोलिसांना घडला प्रकार सांगितला. 

Web Title: Kolhapur News businessman kidnap incidence in Ichalkaraji