राजेंनी परिवर्तनाचे, विकासाचे राजकारण करावे - फडणवीस

राजेंनी परिवर्तनाचे, विकासाचे राजकारण करावे - फडणवीस

कागल - समरजितसिंह घाटगे यांनी राजे विक्रमसिंह घाटगे यांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा चांगल्या तऱ्हेने चालविला आहे. आता त्यांनी राजेंचा राजकीय वारसाही चालवावा. तालुक्‍यातील खालच्या दर्जाच्या राजकारणाला छेद देऊन त्यांनी विकासाचे राजकारण करावे. प्रत्येक व्यक्तिला सोबत घेऊन परिवर्तनाचे राजकारण करावे, लोक त्यांना निश्‍चितपणे साथ देतील. असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

येथील दि कागल को-ऑप बॅंकेचा " राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बॅंक लि., कागल" असे नामकरण करण्यात आले. हा नामकरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते.  

श्री फडणवीस म्हणाले, महिलांकडे उपजतच व्यवस्थापनाची कला असते. त्याला कौशल्याची जोड दिली तर या महिला उद्योजकेतच्या माध्यमातून मोठे क्षितीज गाठू शकतात. महिलांच्या उर्जेशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांना प्रशिक्षण, त्यांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करीत आहे. त्यातून महिला व त्यांची घरे समृध्द होत आहेत. 

ते म्हणाले, ज्या लोकांनी शाहू महाराजांचे नाव वापरुन मते व अनेक वर्षे राज्य केले. पण शाहू महाराजांच्या घराण्याचा विषय ज्याज्या वेळी आला, त्यात्या वेळी हे घराणे वरचढ होऊ नये म्हणून कसे डावलता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला. त्या लोकांच्या पोटात आता मळमळत आहे. म्हणून संभाजीराजे किंवा समरजितराजे यांच्यावर ते खालच्या पातळीवरील टीका करीत आहेत. याला उत्तर हा उपस्थित जनसमुदाय आहे. त्या लोकांना त्यांची जागा ही जनताच दाखवून देईल.

जिल्ह्यातील चिकोत्रा व आंबेओहोळ या दोन प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, चिकोत्रा धरण भरले पाहिजे. समरजितसिंह घाटगे यांनी सुचविल्याप्रमाणे आम्ही ते करणार आहोतच. त्यातून चिकोत्रा भरेलच. आंबेओहोळचे राहिलेले कामदेखील पूर्ण केले जाईल. यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. यातून शेतकरी समृध्द होईल. 

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नेते स्वार्थासाठी एकत्र येतात, पण गावागावात, घराघरात वीष ओतत राहतात. आमच्या यशाला ते सूज म्हणतात, मग अशी सूज त्यांना का येत नाही. समरजितसिंह यांच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची घसरली आहे. त्यामुळे ते बेछूट टीका करीत सुटले आहेत. समरजितसिंहानी तिकडे लक्ष देऊ नये. 

सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सहकारात घोटाळे करणाऱ्यांना दहा वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सहकार कुणी बुडविला याचे चिंतन त्यांनीच करावे. सहकाराच्या समृध्दीशिवाय महाराष्ट्र समृध्द होऊ शकणार नाही. आमच्या राजकारण सुडाचे नाही. चुकीचे कार्य करणाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. 

समरजितसिंह घाटगे म्हणाले, शून्य एनपीए असणारी आमची बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात बॅंकेच्या आणखी दहा शाखा काढत आहे. असे सांगत मुद्रा प्रमाणे "छत्रपती शाहू महाराज युवक योजना" शुभारंभ केल्याचे त्यांनी जाहीर केले. 

पालिकेला आग लागली की लावली ?
समरजितसिंह घाटगे म्हणाले, काही जणांना वाटते कागल - गडहिंग्लज ही आमची राजकीय जहागिरी आहे. तेथे काहीही केले तरी चालते. अशा लोकांना कायद्याचा दणका बसायला हवा. कागल नगरपालिकेला आग लागली की लावली याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांवरची टीका कदापिही सहन केली जाणार नाही. 

मुख्यमंत्री दोनदा आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आले. असे खोचक टीका विरोधक करतात. ज्यांनी राजे विक्रमसिंह घाटगे व खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना "आशिर्वाद" या शब्दाचा अर्थ काय कळणार?

- समरजितसिंह घाटगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com