‘वेगळं’च्या नादात बालके गुन्हेगारीकडे..

निखिल पंडितराव
रविवार, 25 मार्च 2018

कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे. 

कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे. 

राजारामपुरी पोलिसांनी डिग्गीतील पैसे चोरणाऱ्या चार बालगुन्हेगारांना पकडले. यापूर्वी चेन स्नॅचिंग, चोरी अशा विविध गुन्ह्यांत लहान मुले असल्याचे उघडकीस आले. झटपट मिळणारा पैसा, चैनी, मित्रांकडूनच दिले जाणारे आव्हान, संगतीचा परिणाम अशा विविध गोष्टींमुळे मुले बालगुन्हेगारीकडे वळत आहेत. शहरात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांत बालगुन्हेगार पुढे येत असून, शहरातील काही विशिष्ट भागही यासाठी आता पोलिसांच्या नजरेसमोर येत आहेत. 

मुलांच्या मनात मानसिक संघर्ष निर्माण होतो, मन भरकटते व गुन्ह्याच्या मार्गाला जाते, असेच आतापर्यंत अटक केलेल्या मुलांत दिसून आले. इंटरनेट, अज्ञान, कौटुंबिक, सामाजिक, विषम परिस्थिती, क्षणिक रागाच्या भरात प्रलोभनाच्या आकर्षणामुळे ती गुन्हेगारीकडे वळतात. 

इंटरनेटसारख्या प्रगतीच्या बरोबरीने आवश्‍यक असणारा मानसिक समतोल मात्र विकसित झालेला नाही. त्यामुळे वैयक्तिक व सामाजिक वर्तनाची पातळी सामान्यपणे खालावली आहे. असमंजस आणि अपरिपक्व मनासाठी गंभीर स्वरूपाची माहिती घातक ठरते. 

चांगले-वाईट समजण्याची बुद्धी व तारतम्य नसेल, तर केवळ सोयीच्या बाजू स्वीकारल्या जातात आणि परिणामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. १२ ते १६ वर्षे हा काळ बालकांच्या वयातील अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मुलांत शारीरिक व मानसिक बदल फार झपाट्याने होतात. भावनावशता व स्वयंकेंद्रीवृत्ती हे या अवस्थेचे कारण आहे.

या वयात निश्‍चित काय करावे व काय करू नये, याबद्दल मुलांच्या मनात संघर्ष चालू असतो. काही तरी भव्यदिव्य करून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे, असे वाटून ती या कृत्यांकडे वळतात. विधायक आणि विघातक याची जाण नसते, यातूनच त्यांना काहीजण चिथावणी देतात किंवा काही अट्टल गुंड व गुन्हेगार त्यांचा वापरही करून घेतात. 

कुटुंबातील हरवलेला संवाद, विभक्त कुटुंब पद्धत, इंटरनेटचे मिळालेले अवास्तव स्वातंत्र्य या प्रमुख गोष्टींसह विविध बाबी लहान मुलांना अशी कृत्ये करण्याकडे नेतात. १२ ते १६ या वयात त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या मुलांना जबाबदारीचे भान नसल्यानेच ती अशी कृत्ये करतात आणि आयुष्यभर त्यांना पश्‍चातापाची वेळ येते. मोबाईलवर काय पाहतात, यावर अंकुश ठेवला पाहिजे हे सांगणे सोपे आहे, किंवा हे करा, हे करू नका हे सांगणे सोपे आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुटुंबावर आहेच. आज काल संस्कार वर्ग, सुटीतील शिबिरे होतात, यात मोबाईलसाठी एक वर्ग चालवायला हवा. मोबाईलवर काय पाहावे, काय पाहू नये, चांगले-वाईट याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे.
- संजय मोहिते,
जिल्हा पोलिस अधीक्षक

लहान मुलांची पौगंडावस्था अत्यंत महत्त्वाची असते. यावेळी चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबल्या गेल्यास ते गुन्हेगारी, व्यसनाधीनतेकडे वळतात. इंटरनेटमुळे त्यांना मोठे दालन खुले झाले; पण त्याचा वाईट परिणाम होत आहे. मुलांची संगत, कौटुंबिक दुर्लक्ष, मोबाईलचा अती वापर यामुळे त्यांच्यावरील सामाजिक परिस्थिती बदल्यामुळे ते काही तरी वेगळं करून दाखविण्याच्या पॅशनच्या नादात गुन्हेगारी कृत्ये करतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी बदलली पाहिजे. पूर्वी चोरून धूम्रपान करणे, बीअर पिणे याला काही तरी वेगळं करतो, असे मानले जायचे; परंतु आजकाल सामाजिक स्थित्यंतरामुळे चोरी किंवा गांजासारखी नशा करणे वेगळं करतोय, अशी परिभाषा झाली आहे. 
- डॉ. निखिल चौगुले,
मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News child crime special story