कोल्हापूर पालिकेत स्थायी सभापतिपदी प्रथमच मिळणार महिलेला संधी

विकास कांबळे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - महापालिकेने पदाच्याबाबतीत अनेक विक्रम केले आहेत. आता आणखी एक नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेत सुरू आहे. या वेळी स्थायी समिती सभापतिपदी नगरसेविका निश्‍चित असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदीही भाजप महिलेला संधी देण्यात येणार असल्याचे समजते. काँग्रेसचे सभागृह नेतेही बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते.

कोल्हापूर - महापालिकेने पदाच्याबाबतीत अनेक विक्रम केले आहेत. आता आणखी एक नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेत सुरू आहे. या वेळी स्थायी समिती सभापतिपदी नगरसेविका निश्‍चित असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदीही भाजप महिलेला संधी देण्यात येणार असल्याचे समजते. काँग्रेसचे सभागृह नेतेही बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते.

आतापर्यंत पती, पत्नी महापौर झाले. महापौरपदाच्या खांडोळ्या झाल्या. स्थायी समिती सभापती पदाच्याही खांडोळ्या झाल्या. एवढेच नव्हे तर सभागृहापर्यंत सत्तारूढ आघाडीचाच विरोधी पक्षनेताही असायचा. यावेळची महापालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर झाल्यामुळे महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाकडे आहे.

महापालिकेच्या आर्थिक नाड्या असणाऱ्या आणि शहराचे धोरण ठरविणाऱ्या स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छुकांची मारामारी असते. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदी निवड करत असताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागते. सभापतिपदी आजपर्यंत महिलेची निवड कधीही झालेली नाही. या वेळी मात्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवड १२ फेब्रुवारीस होण्याची शक्‍यता आहे. सध्या सभापतिपद काँग्रेसकडे होते. आता हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांच्याबरोबरच अफजल पिरजादे इच्छुक आहेत. सौ. पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा आहेत. श्री. पिरजादे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये जोरात रस्सीखेच आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने त्यांनी ज्याप्रमाणे पदे वाटून घेतली आहेत, त्याप्रमाणे भाजप व ताराराणी आघाडी यांच्यात आघाडी असल्याने त्यांनीही विरोधी पक्षनेतेपद एक वर्षासाठी वाटून घेतले आहे. 

सुरुवातीला भाजपने हे पद आपल्याकडे घेतले होते. त्यानंतर ताराराणी आघाडीकडे हे पद आले. त्यामुळे किरण शिराळे यांची निवड झाली. त्यांचीही मुदत संपली आहे. श्री. शिराळे पूर्वीपासून महाडिक गटाशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांना प्रथम संधी देण्यात आली. आता पुन्हा हे पद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. या पदावर भाजपही महिलेला संधी देण्याची शक्‍यता आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल.

सभागृह नेते प्रवीण केसरकर दोन वर्षे या पदावर आहेत. त्यांनाही बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. श्री. केसरकर यांनी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन पदावरून मुक्‍त करण्याची विनंती केली असल्याचे समजते.  

स्थायी व परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडी १२ फेब्रुवारीला होण्याची शक्‍यता आहे. परिवहन समिती सभापतिपदासाठी शिवसेनेचे राहुल चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Kolhapur News Corporation Standing Chairman election