प्रवेशासाठी देणगी... लाचलुचपतकडे तक्रार करा 

सुधाकर काशीद
गुरुवार, 22 जून 2017

शासकीय अनुदान असेल व विद्यार्थ्याला प्रवेशासाठी म्हणून देणगीची मागणी केली जात असेल किंवा देणगी दिली तरच प्रवेश असे सांगितले गेले तर पालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू शकतो.  मात्र पालक शाळेसाठी स्वेच्छेने देणगी देऊ शकतो. पण त्याची अधिकृत पावती दिली नाही किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसेल तर तो गुन्हा ठरू शकतो. 
​सुहास नाडगोंडा, उपअधिक्षक लाचलुचपत, प्रतिबंधक विभाग 

कोल्हापूर - पोलिस महसूल, आर टी ओ, सीटी सर्व्हे, या विभागात लाच घेताना कोण ना कोण सापडणार हे तर खरेच आहे. पण आता शाळा प्रवेशासाठी देणग्या घेणाऱ्या व पुन्हा वर समाजाची शैक्षणिक सेवा करण्याचा आव आणणाऱ्या पांढरपेशी लाचखोरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपले जाळे पसरले आहे. सातारा जिल्ह्यात तीन, कोल्हापूर जिल्ह्यात एक अशा चार कारवाईत मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतले क्‍लार्क व संस्था पदाधिकारीही सापडले आहेत. 

ज्या शाळांत अनुदानीत आहेत किंवा शासनाचा या ना त्या मार्गाने निधी त्यांनी घेतला आहे, त्या शाळांत प्रवेश देणे देतो म्हणून जर सक्तीने देणगी मागितली तर पालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करायची संधी आहे. त्यासाठी पालकाने देणगीसंदर्भातले संभाषण मोबाईल किंवा अन्य मार्गाने टेप करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देणे व रितसर तक्रार करणे गरजेचे आहे. संभाषण टेप करता आले नाही तरी सरकारी पंचासोबत जाऊन प्रवेशासंबंधी चर्चा व त्या चर्चेत विनापावती देणगीचा संदर्भ आला तरी ती चर्चा कारवाई करण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. देणगी 20 हजाराची व पावती 10 हजाराची हा प्रकारदेखील कारवाईच्या कक्षेत येणार आहे. 

विनाअनुदानित शाळांतून आकारली जाणारी वीनापावती देणगीही लाचलुचपतच्या कक्षेत असून विनाअनुदानित शाळांना फी आकारण्याचा अधिकार आहे पण विनापावती देणगी घेण्याचा अधिकार नाही. पावती घेऊन देणगी घेणाऱ्या शाळांची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे असणेही गरजेचे आहे. 

लाचलुचपत विभागाच्या पुणे अधिक्षक कार्यालयाच्या अखत्यारीत सातारा जिल्ह्यात तीन व काल कोल्हापूर जिल्ह्यात एक कारवाई झाली आहे. 

शाळा प्रवेशाची धामधूम असल्याने काही शाळांत अक्षरशः उघडपणे देणगीच्या नावाखाली पैशाची मागणीकेली जात आहे. 

काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा यात पुढे आहेत. आपल्यावर या राज्यातील शिक्षण खात्याचे निर्बंध नाहीतच असा त्यांचा कारभार आहे. याशिवाय अन्य काही शाळांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा देणगीला व फीलाच महत्त्व आहे. 

याशिवाय गणवेश, बूट, वह्या व इतर साहित्य या शाळा ज्या दुकानातून खरेदी करायला सांगीतली तेथेच खरेदी करायची सक्ती आहे. स्नेहसंमेलनाची फी, स्नेहसंमेलनाच्या ड्रेसचा खर्च वेगळाच आहे. बहुतेक पालकांना हा खर्च परवडत नाही. उठसूठ या ना त्या कारणासाठी पालकांकडून पैशाची मागणी मान्य नाही. पण आपल्या मुलाचे, मुलीचे शैक्षणिक भवितव्य खराब केले जाईल या भितीने पालक हे पैसे भरत असतात. त्यांच्याविरोधात तक्रार शिक्षण विभागाकडे केली तर त्याचा परिणाम होत नसल्याने लाचलुचपतकडे तक्रार हा एक मार्ग मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Donation for admission