वाढत्या शहरीकरणामुळे जलप्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर

डॅनियल काळे
शुक्रवार, 7 जुलै 2017

सांडपाण्यावर प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, जनप्रबोधनाचीही आवश्‍यकता

सांडपाण्यावर प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, जनप्रबोधनाचीही आवश्‍यकता
कोल्हापूर - जलप्रदूषणाने अलीकडच्या काळात गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकरणाचा पसारा या पार्श्‍वभूमीवर पाण्याच्या शुद्धीकरणाकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष तसेच प्रशासन, नागरिक यांना या प्रश्‍नाचे नसलेले गांभीर्य त्यामुळे जलप्रदूषणाचा विळखा घट्टच होत चालला असून हे प्रदूषण मानवी जीवनाच्या मुळावरच येण्याची शक्‍यता आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी भरीव निधीची गरज, अद्यावत अशा सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीबरोबरच जनप्रबोधनाची सांगड घातल्याशिवाय हे दुखणे संपणार नाही.

देशात आता कमालीचे शहरीकरण होत चालले आहे. रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातील मोठे लोंढे शहरांच्या दिशेने येत असून शहरीकरण वाढले आहे. शहरीकरणात नियोजित विकासाऐवजी दिसेल तेथे दाट नागरी वस्त्या होत आहेत. परिणामी, साऱ्या समस्यांचे मूळ शहरीकरणातच लपलेले आहे. शहरी भागातून एकेकाळी शुद्ध पाणी घेऊन वाहणारे नाले, नद्या आता सांडपाण्याचे आगार झाले आहे. हे सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून थेट नदीमध्ये मिसळत असल्याने नद्यांचे रूपांतर गटारगंगेमध्ये झाले आहे. राज्यभरातील सर्वच शहरांत कमी अधिक प्रमाणात जलप्रदूषणाचा हा विषय गंभीर बनत चालला आहे.

शहरांना शुद्ध पाण्यासाठी एका बाजूला थेट धरणातून पाणी आणण्याच्या योजनांवर राज्य, केंद्र सरकार हजारो कोटी रुपयांचा चुराडा करत असताना दुसऱ्या बाजूला यातून निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध करण्यासाठी मात्र तुटपुंजा निधी देऊन तात्पुरती मलमपट्टी करण्यातच धन्यता मानली जात आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पालाही निधी हवा
शहरी भागात नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या योजनांवर हजारो कोटी रुपये राज्य, केंद्र सरकार खर्च करत आहेत. त्या तुलनेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर मात्र फारसा खर्च होताना दिसत नाही. ज्याप्रमाणे सरकार पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी देते, तेवढ्याच प्रमाणात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठीही निधी दिला, तर जलप्रदूषणाचे दुखणे मर्यादित राहील. अन्यथा, त्याचे स्वरूप दिवसेदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता तपासायला हवी
अनेक शहरांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली आहे. परंतु या प्रकल्पांची कार्यक्षमताही तपासायला हवी. अनेकदा केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करून सुरू करण्याची औपचारिकताच पाळली जाते; पण त्याच्या कार्यक्षमतेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. जलप्रदूषणाची हीच प्रमुख कारणे आहेत.

औद्योगीकरणाचा परिणाम
शहरीकरणासोबत वाढते औद्योगीकरण हेही जलप्रदूषणाचे महत्त्वाचे कारण आहे. कारखान्यातून बाहेर पडणारे रसायनयुक्त, मळीयुक्‍त घाणेरडे पाणी थेट नदीमध्ये आजही मिसळते. हे पाणीच अनेक गावांतील नागरिकांना प्यावे लागते. अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रेही नाहीत. नदीद्वारे, विहिरीतून उपसले जाणारे पाणीच थेट नागरिकांना पिण्यासाठीही वापरावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होणार आहेत.

कचऱ्याच्या निर्गतीचाही प्रश्‍न
सांडपाण्यासोबतच शहरी भागातील कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने हा कचराही थेट नदीमध्ये मिसळत आहे. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाणही मोठे असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. कचऱ्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारे प्रकल्प सर्वत्र असायला हवेत; पण असे प्रकल्प करण्यावर खूपच मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरातील कचरा निर्गतीचा प्रश्‍न तर गंभीर आहेच; पण हाच कचरा थेट पाण्यात मिसळत असल्याने पाण्याचे प्रदूषणही वाढत आहे.

जनावरे, कपडे धुणे थांबणार कधी?
नदीमध्ये, तलावांत जनावरे धुणे, कपडे धुणे यांचे प्रमाण आजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे देखील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. प्रबोधन करणारे फलक लावणे, जुजबी कारवाई करणे, असे प्रकार प्रशासन करत असले तरी हे प्रकार थांबलेले नाहीत. नागरिकांचे प्रबोधन करणे आणि लोकसहभागाच्या कृतीची जोड दिल्याशिवाय पाण्याचे प्रवाह दूषित करण्याचे प्रकार थांबणार नाहीत. कपडे धुणे अथवा जनावरांना अंघोळ घालणे यासाठी ठिकठिकाणी पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Due to increasing urbanization, the question of water pollution is serious