कोल्हापूरात अतिक्रमण हटाव बंद... अवैध धंदे सुरू

विकास कांबळे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी येथील गाडीअड्ड्यातील अतिक्रमण काढण्यास कोणाचाही विरोध नाही. असे असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील थांबविलेली कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. लोकप्रतिनिधी वारंवार यासंदर्भात विचारणा करत असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हे नगरसेवकांना न सुटलेले कोडे आहे

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी येथील गाडीअड्ड्यातील अतिक्रमण काढण्यास कोणाचाही विरोध नाही. असे असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील थांबविलेली कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. लोकप्रतिनिधी वारंवार यासंदर्भात विचारणा करत असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हे नगरसेवकांना न सुटलेले कोडे आहे. दरम्यान, येथील कारवाई थांबल्याने पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत.

व्हिनस कॉर्नर येथील गाडीअड्डा चर्चेत आला, तो सांगली पोलिसांच्या कारवाईमुळे. शाहू क्‍लॉथ मार्केट परिसरातील काही स्क्रॅप विक्रेत्यांचे येथे पुनर्वसन केले. स्क्रॅप विक्रेत्यांनी संपूर्ण जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. सांगलीतील वाहन चोरी करणारी टोळी सापडली. या चोरट्यांनी चोरलेली वाहने कोल्हापुरातील गाडीअड्ड्यात विकल्याचे सांगितले होते. सांगली पोलिसांनी छापे टाकून ती वाहने जप्त केली. तेव्हापासून गाडीअड्डा चर्चेत आला. महापालिकेने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली. कारवाईच्या दरम्यान श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला. या आराखड्यात गाडीअड्ड्याच्या जागेवर भक्‍त निवास व पार्किंगचा समावेश आहे. 

पोलिसांना आव्हान 
अतिक्रमण कारवाई करताना याठिकाणी मटका व्यवसाय, अनधिकृतपणे गॅस भरण्याचा व्यवसाय तसेच जुगारही चालत होता. कारवाई सुरू झाल्यानंतर मात्र येथील अवैध व्यवसाय थांबले होते. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई बंद झाल्यानंतर मात्र याठिकाणी महापालिका प्रशासनाला आणि पोलिसांना आव्हान देत पुन्हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू झाले.

अतिक्रमण काढताना येथील व्यावसायिक विरोध करतील, या अपेक्षेने जेसीबी, डंपर, पोलिस फौजफाटा, शंभर कर्मचाऱ्यांच्या पथकासह अतिक्रमण निर्मूलनाचे पथक गाडीअड्ड्यावर गेले. मात्र येथील व्यावसायिकांनी कारवाईला विरोध केला नाही. येथील व्यावसायिकांनी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी करत कारवाईला विरोध नसल्याचे सांगितले. वाहने हलविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली. मात्र येथील वाहने व्यावसायिकांकडून बाहेर नेण्याची जी गती होती, ती कारवाई थंडवाल्यामुळे थांबली. यासंदर्भात स्थायी समिती सभापती आशिष ढवळे गाडीअड्ड्यातील अतिक्रमण काढण्याच्या व जागा ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. प्रत्येक स्थायीच्या बैठकीत आठ दिवसांत काम करून घेण्याचे आश्‍वासन दिले जाते. मात्र काहीच कारवाई होत नाही. 

 

Web Title: Kolhapur News illegal businesses in Laxmipuri region