शाहू जयंती विशेषः ‘आंतरजातीय विवाह’ची शतकपूर्ती

प्रमोद फरांदे
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांनी २८ वर्षांच्या राज्यकारभारातून सर्व समाजाच्या कल्याणाचेच निर्णय घेतले. अनेक कायदे केले. त्यातील विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाह कायद्याची शतकपूर्ती झाली आहे.

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांनी २८ वर्षांच्या राज्यकारभारातून सर्व समाजाच्या कल्याणाचेच निर्णय घेतले. अनेक कायदे केले. त्यातील विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाह कायद्याची शतकपूर्ती झाली आहे. विधवा पुनर्विवाहासंबंधी कायद्याला पुढील महिन्यात २७ जुलैला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत; तर जातिभेदावर प्रहार करणाऱ्या आंतरजातीय विवाह कायद्याला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही कायद्यांतून शाहू महाराजांची कर्ता सुधारक, लोककल्याणकारी राजा अशी ओळख अधिक उजळते.

राजर्षी शाहू महाराज कर्ते सुधारक, विचारवंत होते. प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कोल्हापूरचे नाव सांगितले, की शाहू महाराजांचे नाव घेतले जाते. त्यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय, कायद्याद्वारे सर्व समाजाला उन्नतीची दारे खुली केली.

महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक ठरते. धार्मिक रूढी-परंपरांमुळे स्त्रियांच्या वाट्यास आलेले जगणे, त्यांना मिळणारी हीन वागणूक नाहीशी केली. त्यांना समतेची वागणूक मिळावी, यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. मुलींना शुल्क माफ करून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. स्वत:च्या सुनेला त्यांनी उच्च शिक्षण दिले. धर्माच्या नावाखाली मुला-मुलींना देवाला सोडण्याची प्रथा कायद्याने बंद केली. त्या काळात बालवयात मुला-मुलींची लग्ने होत. अगदी बालवयात नवऱ्याचा मृत्यू झाला तरी हिंदूधर्मशास्त्राप्रमाणे विधवेस विवाह करण्याची परवानगी नव्हती. उलट नवऱ्याच्या मृत्यूस तिलाच जबाबदार धरले जात असे.

पुढील आयुष्य एकाकी, अपमानास्पदरीत्या जगावे लागत असे. अंधःकारमय आयुष्य जगणाऱ्या या महिलांना सन्मानाचे आयुष्य जगता यावे यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात २६ जुलै १९१७ रोजी विधवा पुनर्विवाह कायदा केला. हा विवाह विधीपूर्वक करावा, अशीही योजना केली. या कायद्याला पुढील महिन्यात १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या कायद्याप्रमाणेच आंतरजातीय विवाहालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. १९१७ मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा मांडला होता. अनेक सनातनी मंडळींनी या कायद्याला जोरदार विरोध दर्शविला. शाहू महाराजांनी मात्र या कायद्यास जाहीर पाठिंबा दर्शविला. आंतरजातीय विवाह घडवून आणले, तसा कायदाही संस्थानात ४ फेब्रुवारी १९१८ रोजी केला.

विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह कायदा करण्याचे शाहू महाराजांचे कार्य क्रांतिकारी आहे. त्यांनी स्वत:च्या चुलत बहिणीचा आंतरजातीय विवाह घडवून आणला. अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या कायद्यांचे प्रतिबिंब राज्यघटनेमध्ये दिसून येते. 
- प्राचार्य डॉ. विलास पोवार,
शाहू अभ्यासक

Web Title: Kolhapur News Inter cast Marriage special