मुक्‍या प्राण्यांना आसरा देणाऱ्या जाधव भगिनी

अमृता जोशी
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

साळोखेनगर येथील दाक्षायणी आणि शर्वाणी जाधव या भगिनींनी मोकाट सुटलेल्या, जखमी, आजारी, पोरक्‍या झालेल्या आणि व्याकूळ होऊन भरकटलेल्या कुत्र्या-मांजरांना चक्क घरात आश्रय दिलाय.

कोल्हापूर - गुड्डू, राज, चैतन्य, खंडू, अरमान, छुटकी, राखी, राणू आणि मन्नत-जन्नत, ओम-जय-जगदीश, पीयूष-परी प्रीतम, लकी ही नावे आहेत, कुत्री आणि मांजरांची..!! एकमेकांचे शत्रू असलेली कुत्री आणि मांजरे मुक्तपणे संचार करत एकाच घरात एकमेकांशी पक्की दोस्ती करून राहतात. 
कधी भुंकतात, गुरगुरतात, कधी भांडतात, पुन्हा एक होतात.

काही घरांत आगंतुक पाहुणा जास्त दिवस थांबला तरी गैरसोयींवरून नाराजी व्यक्त होते; पण साळोखेनगर 
येथील दाक्षायणी आणि शर्वाणी जाधव या भगिनींनी मोकाट सुटलेल्या, जखमी, आजारी, पोरक्‍या झालेल्या आणि व्याकूळ होऊन भरकटलेल्या कुत्र्या-मांजरांना चक्क घरात आश्रय दिलाय. त्यांचे संगोपन करत भूतदयेची अनोखी पायवाट मळवलीय. त्यांच्या प्रयत्नातून मोकाट हिंडणाऱ्या मुक्‍या प्राण्यांना आधार देण्याची प्रेरणा इतरांना निश्‍चितच मिळेल.
महागडी कुत्री, मांजरे पाळण्याची हौस अनेकांना असते. 

या लाडावलेल्या कुत्र्या-मांजरांचे कौतुक अनेकांनाही असते. मात्र, आजारी, जखमी भटक्‍या कुत्र्या-मांजरांची अवस्था पाहता, ती पाळण्याचा मोह क्वचितच होतो. त्यांच्यापासून उद्‌भवणाऱ्या रोगांबाबतच्या जागृतीमुळे किंवा भीतीमुळे त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले जाते. त्यांना पाळण्याचा प्रयत्न केलाच, तर फुकटचे सल्ले देणाऱ्यांची कमी नसते.

या कुत्र्या-मांजरांवर औषधोपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रोजचा आहार, रेग्युलर डोसेस, अँटिरेबीज लस, आजारी पडल्यावर औषधोपचार केले जातात. त्यांची नसबंदी करून घेऊन महापालिकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या अभियानात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला आहे. कॉलनीतील रहिवासी, शेजाऱ्यांचा विरोध पत्करून जाधव कुटुंबीय भटक्‍या कुत्र्या-मांजरांसाठी अथक परिश्रम घेतात. 

१५ वर्षांपूर्वी शाळेत असताना गल्लीतील कुत्री विषारी गोळ्या घालून मारली जात होती. असेच घराजवळ एका कुत्रीला मारले. तिच्या तान्ह्या पिल्लांचे डोळेही त्यावेळी उघडले नव्हते. आम्ही त्यांना घेऊन घरी आलो. तेव्हापासून कुत्री-मांजरे आमचे कुटुंबीयच बनली. आजपर्यंत साधारण ५० कुत्री-मांजरे घरी आणली. त्यांतील काहींना हौशींना दत्तक दिले. हे प्राणी कोणालाही त्रास देत नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र शेल्टर हाऊस उभे करण्याची इच्छा आहे.
- दाक्षायणी जाधव

महापालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी केली जाते. यात अनेकदा कुत्री सापडत नाहीत किंवा पळून जातात. यासाठी कुत्र्यांना माणसाळवणे आवश्‍यक आहे. त्यानंतर ऑपरेशन करणे शक्‍य होईल. भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्‍न मोठे आहेत. यासाठी त्यांना रेबीजची लस देणे, नसबंदीच्या माध्यमातून त्यांची संख्या नियंत्रित करणे आवश्‍यक आहे. मात्र, प्राण्यांना मारून टाकू नये, असे मनापासून वाटते. यासाठी लोकांत जागृती व्हावी. 
- शर्वाणी जाधव

Web Title: Kolhapur News Jadhav sister giving shelter to pseudo animal