कागल पालिकेतील 'आग संशयास्पद'

वि. म. बोते
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कागल - पालिकेस लागलेली आग संशयास्पद आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. 

कागल - पालिकेस लागलेली आग संशयास्पद आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. 

पक्षाचे नगरसेवक विशाल पाटील (मळगेकर), प्रवीण कदम, सुरेश मलगोंडा पाटील, राजाराम निंबाळकर यांनी आज दिलेल्‍या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडेच या इमारतीचे नूतनीकरण झालेले आहे. त्यामुळे ही घटना संशयास्पद आहे. पालिकेकडे कर्मचाऱ्यांचा प्रचंड कंत्राटी स्टाफ आहे. आग लागली त्यावेळी एकही सुरक्षारक्षक नव्हता. जवळच अग्निशमन यंत्रणा आहे. ही यंत्रणा आगीपुढे कुचकामी ठरली. सुरक्षारक्षक जागेवर नसल्यामुळे अनर्थ घडला.

पापाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही घटना घडविण्यात आली आहे, असा आमचा संशय आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. जळालेल्या विभागात घरकुल तसेच इतर बांधकामासंदर्भात, नागरिकांच्या गुंठेवारी तसेच अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारींची कागदपत्रे आहेत. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविल्याचे अर्जही आहेत. घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारी यापूर्वीच झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.

घरकुलची कागदपत्रे जळाली
बांधकाम अभियंता सुनील माळी म्हणाले, ‘‘घरकुल प्रकल्पाची कागदपत्रे बांधकाम विभागातच होती. ती आगीत जळाली; मात्र ती सर्व कागदपत्रे पुन्हा मिळू शकतात. विरोधकांनी माहितीच्या अधिकारात सतत माहिती मागविल्यामुळे त्यांच्याकडून पैसे भरून घेऊन गेल्या महिन्यांतच त्या फायलीची झेरॉक्‍स त्यांना दिली आहे. त्यामुळे ती कागदपत्रे त्यांच्याकडून मागवून घेऊन पुन्हा फाईल करता येते. इस्टिमेट ज्यांनी केले त्यांच्याकडून प्रत मिळू शकते. कॉन्ट्रॅक्‍टरचे करारपत्र त्याच्याकडून घेऊ शकतो. सर्व प्रकरणांच्या संपूर्ण फायली पुन्हा तयार आम्ही करू शकतो. मात्र त्यासाठी थोडा अवधी लागेल. प्रस्तावांच्या मंजुरीसाठी त्यांच्या फायली विविध शासकीय कार्यालयात सादर केलेल्या असतात. त्यांच्याकडूनही त्यांची प्रत मिळू शकते. 

आरोग्य विभागातील जळालेली कागदपत्रे
आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानुसार जळालेली कागदपत्रे अशी ः रमाई आवास घरकुल योजना अनुदान मागणी प्रस्ताव, शौचालय अनुदान मागणी प्रस्ताव, सर्व प्रकारचे ना-हरकत दाखले फाइल, आरोग्य विभागाकडील सर्व कामांच्या निविदा फाइल, वित्त आयोग शासकीय पत्रव्यवहार, माहिती अधिकार फाइल, प्रदूषण नियंत्रण मंडळ फाइल, विवाह नोंदणी फाइल, स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रस्ताव फाइल, सर्व प्रकारचे पुरस्कार प्रमाणपत्रे, आवक-जावक पत्रव्यवहाराचे सर्व रजिस्टर, स्वच्छता सर्वेक्षण २०१८ चे सर्व प्रस्ताव, सर्वप्रकारचे माहिती अहवाल, निवडणूक फाइल, सर्व प्रकारचे स्टॉक बुक, सर्व कर्मचाऱ्यांचे गणवेश, आरोग्य विभागाकडील सुरक्षा उपकरणे. 

Web Title: Kolhapur News Kagal corporation `Fire suspicious`