गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

कोल्हापूर - चारचाकी लावण्याच्या कारणावरून एकावर भरलेले रिव्हॉल्व्हर रोखून नंतर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे (वय ३९, रा. रंकाळा परिसर, शालिनी पॅलेसच्या मागे) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर - चारचाकी लावण्याच्या कारणावरून एकावर भरलेले रिव्हॉल्व्हर रोखून नंतर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे (वय ३९, रा. रंकाळा परिसर, शालिनी पॅलेसच्या मागे) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

ताराबाई पार्कातील वृषाली हॉटेलसमोर मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी अनंत प्रेमनाथ शेट्टी (४३, रा. कापीकाड, मंगळूर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

श्री. शेट्टी व त्यांची बहीण आरती रई हे मोटारीमधून (केए- १९ एमसी-४४२७) हॉटेल वृषालीत पहाटे सव्वाचारला आले. त्या वेळी बोंद्रे आपल्या मोटारीमधून (एमएच- ०९ ईके- ०१११) तेथे आला होता. श्री. शेट्टी यांची मोटार हॉटेलच्या गेटवर उभी होती, त्यामुळे बोंद्रे याची मोटार जाऊ शकत नव्हती. यावरून या दोघांत जोराचा वाद झाला. त्या वेळी बोंद्रेने श्री. शेट्टी यांना शिवीगाळ केली. त्यातून हा वाद वाढत गेला. त्याचे पर्यवसान बोंद्रेने आपल्याजवळील भरलेले रिव्हॉल्वर श्री. शेट्टी यांच्या दिशेने रोखून त्यांना ठार करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने या रिव्हॉल्वरमधून हवेत एक गोळीही झाडली. 

या घटनेनंतर श्री. शेट्टी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन बोंद्रेच्या मोटार नंबरसह फिर्याद दिली. त्या वेळी संशयित बोंद्रेचे नाव निष्पन्न झाले नव्हते. त्याच्या मोटारीच्या नंबरवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पोलिसांनी ही मोटार बोंद्रेचीच असल्याची माहिती काढली. त्यानंतर सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. श्री. शेट्टी यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांचे एक पथक हॉटेल वृषाली येथे पोचले. त्यांनी या घटनेबाबत हॉटेलचे सुरक्षारक्षक व इतरांकडून माहिती घेतली. बोंद्रेवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

सीसीटीव्ही फुटेजसाठी प्रयत्न
पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी हॉटेलला भेट दिली. या हॉटेलबाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही माहिती संकलित करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या फुटेजमध्ये हा प्रकार चित्रीत झाल्याचे समजते. 

घरातून ताब्यात
या गुन्ह्यात मानसिंग बोंद्रे हाच संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, संतोष पवार यांनी बोंद्रेला घरातून ताब्यात घेतले. या वेळी सहायक फौजदार संदीप जाधव, हेडकॉन्स्टेबल नीलेश, पोलिस नाईक विशाल चौगले उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Mansingh Bondre arrested in Firing case