सरकार विरोधात कोल्हापूरात राष्ट्रवादीचा हल्लाबोल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला. 

कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला. 

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ऑनलाईन घोळामुळे कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा नाही. राज्य शासन जाहीरातीच्या माध्यमातून भूलथापा मारत आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दसरा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चा सुरवात झाली. शासनाच्या विरोधातील फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसीना फरास, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, आर.के. पोवार, राजू लाटकर, अनिल साळोखे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांच्यासह कागल तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात होता. 

के. पी. पाटील यांनी राज्य शासन नुसत्या फसव्या घोषणा करत असून कर्जमाफीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे सांगितले. खासदार महाडिक यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली. तो फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवला असता तर कर्जमाफीत अडचण आली नसती. राज्य शासन केवळ भूलथापा मारत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

मुश्रीफ म्हणाले, आरक्षणाचा शब्द शासनाने पाळावा, स्मार्ट सिटी योजनतंर्गत सल्लागारांनी लूट केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीवेळी दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील कपात दूर करावी, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्य सरकारच संपावर गेल्याची स्थिती आहे. सरकारने चालते व्हावा असा इशारा निवेदनाद्वारे दिला. 

राष्ट्रवादी गटनेता सुनीस पाटील, नगरसेविका ऍड. सूरमंजिरी लाटकर, महेश सावंत, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, आदिल फरास, प्रसाद उगळे, सुनील देसाई, वंदना जाधव,शीतल तिवडे, प्रकाश कुंभार, रमेश पोवार,संतोष रेडेकर, लाला जगताप, जहिदा मुजावर, आदि मोर्चात सहभागी झाले. 

यवतमाळ येथून नागपूर अधिवेशनावर दिंडी 
आमदार मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांना खाली खेचण्याचा आणि मोदींना घरी बसविण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या काळात कुठलाही घटक सुखी नाही. त्यामुळे सरकारला "चले जाओ' म्हणण्याची वेळ आली. खड्डेमय महाराष्ट्रामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अयशस्वी झाले . साडेचार लाख कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्‍यावर आहे. सरकारने श्‍वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. शिवसेना सत्तेला चिकटून आहे. चांगले काम केले तर गोडवे अन्यथा जोडे मारू असे उद्धव ठाकरे सांगतात. 

दोघेही एकमेकावर टीका करतात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. सरकारच्या विरोधात यवतमाळ येथून दिंडी सुरू होणार आहे. अकरा डिसेंबरला दिंडी नागपूर अधिवेशनावर धडकेल. तेथे जेष्ठ नेते शरद पवार दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News NCP agitation