कोल्हापूरात गॅस सिलेंडर स्फोटात नऊ जखमी

अभिजीत कुलकर्णी
बुधवार, 30 मे 2018

नागाव - पुलाची शिरोली (ता. हातकणंगले ) येथील हौसिंग सोसायटीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक लहान मुलगी, दोन महिलांसह नऊजण जखमी झाले आहेत. 

नागाव - पुलाची शिरोली (ता. हातकणंगले ) येथील हौसिंग सोसायटीमध्ये सकाळी सातच्या सुमारास वायू गळतीने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एक लहान मुलगी, दोन महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत. 

महेंद्र कृष्णात पाटील, मारुती सुतार, निलेश सुखदेव पाटील, निलेश आढाव, सागर पाटील, सुधाराणी काडगोंड, निल्लवा काडगोंड , दिनकर जाधव,  श्रावणी काडगोंड अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी : निल्लवा काडगोंड या सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करत होत्या. पण सिलिंडर संपल्याने त्यांनी घरमालकीन सौ. पाटील यांना बोलाविले. त्यांनी सिलिंडर जोडून दिले व त्या निघून गेल्या. त्यानंतर सौ. निल्लवा यांनी गॅस सुरू केला.

दरम्यान गॅसचा वास येत होता. वास आल्याने वरच्या मजल्यावर राहणारे सर्वजण धावत खाली आले. त्यांनी सौ. निल्लवा यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश करुन गॅस कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेगडीशी जोडलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक खोलीत असणाऱ्या व्यक्तींसह नऊ जण जखमी झाले. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच शशिकांत खवरे, हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष राजू पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News nine Injured in Gas cylinder blast