कुंभार व्यावसायिकांना कर वसुलीच्या नोटिसा

अमृता जोशी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - अनधिकृत मातीसाठ्याबाबत कुंभार व्यावसायिकांना शासनाने कर वसुलीच्या १७ ते १८ लाख रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा बजावल्या. यामुळे हातकणंगले, पन्हाळा तालुक्‍यांतील कुंभार व्यावसायिक हवालदिल झाला आहे.

कोल्हापूर - अनधिकृत मातीसाठ्याबाबत कुंभार व्यावसायिकांना शासनाने कर वसुलीच्या १७ ते १८ लाख रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा बजावल्या. यामुळे हातकणंगले, पन्हाळा तालुक्‍यांतील कुंभार व्यावसायिक हवालदिल झाला आहे. नोटीस काढताना प्रशासनाने मृत व्यक्तीच्या नावाने वसुलीसाठी नोटीस पाठवून कामाचा अजब नमुना दाखवून दिला. कुंभार समाज आज अडचणींतून जात असतानाच शासनाने लादलेल्या या कराच्या ओझ्याने आणखी पिचला आहे. 

संक्रांतीला लागणाऱ्या मडक्‍यांपासून ते मातीची खेळणी, स्वयंपाकाची भांडी, पाण्याचे डेरे, विटा, नागोबा, गणोबा, गणपती, गौरीचे मुखवटे, नवरात्रातील देवीच्या मूर्ती, पणत्या, बैल, मूर्ती, शोभेच्या वस्तू, विविध आकारांतल्या मनी बॅंक यावर हा व्यवसाय चालतो. साधारणपणे एका व्यावसायिकाच्या २५ ते ५० हजार विटा तयार होतात. पारंपरिक व्यवसाय करताना एक कुंभार तीन ते चार महिन्यांत ३० ते ४० हजार उत्पन्न मिळवितो. यामध्ये कुंभाराच्या कुटुंबातील सर्वच जण आपापल्या परीने योगदान देतात.

वंशपरंपरागत कुंभारांना तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांच्या लेखी परवानगीने वर्षभरासाठी पाचशे ब्रासपर्यंत माती, कंकर, दगड, वाळू, मुरुम आदी कररहित खरेदी करता येते. तहसीलदारांच्या सहीने परंपरागत कुंभारांना पाच वर्षांच्या मुदतीने ओळखपत्र दिले जाते. अनेकदा माती खरेदी करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही तलाठी, सर्कल, मुकादम अडवणूक करतात, असे कुंभार बांधवांकडून सांगण्यात येते. माती खरेदी करण्यासाठी भांडवल लागत असल्याने अनेकदा शंभर ब्रासही माती खरेदी होत नाही. यामुळे बोटांवर मोजण्याइतके अपवाद वगळता कुंभारांच्या मोठ्या भट्ट्या नाहीत.

हातकणंगले तालुक्‍यातील पारंपरिक कुंभारांना ओळखपत्र, अनधिकृत मातीसाठ्यासाठी १७-१८ लाखांच्या नोटिसा काढल्या. पारंपरिक कुंभारांना मिळणाऱ्या ओळखपत्राची मुदत पाच वर्षे आहे. प्रत्येक वर्षी पाचशे ब्रास कररहित माती खरेदी करता येते. ओळखपत्र व मातीसाठीच्या परवान्याबाबत स्थानिक पातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांकडून असहकार्याचा सामना करावा लागतो. कायदेशीर बाबींत अडकविल्यामुळे हातावरचे पोट असलेले कुंभार व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
- मारुती कातवरे,
अध्यक्ष, कुंभार समाज.

पारंपरिक कुंभार समाजाला उत्पादनाची हमी व नवीन व्यावसायिक पिढी घडविण्यासाठी प्रशिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. सध्या बेळगाव, खानापूर येथे याचे शिक्षण उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची सुविधा व्हावी, यासाठी संघटित बळावर पाठपुरावा केला. मात्र, शासनाने अद्यापही सकारात्मक निर्णय न घेतल्याने कुंभार समाजातील नव्या पिढीला परंपरागत व्यवसाय संवर्धित करणे अवघड बनल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले.

दंडाने हवालदिल  
शासकीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील परंपरागत कुंभारांना अनधिकृत मातीसाठ्यासाठी नोटिसा काढल्या. मौजे पडळ (ता. पन्हाळा) येथील सावळा ज्ञानू कुंभार हे अनेक वर्षांपूर्वीच मयत झाले. त्यांच्या नावेही अनधिकृत माती साठ्याची ३१ हजार ४८० रुपयांची नोटीस काढली. यापैकी तळंदगे (ता. हातकणंगले) येथील मुकुंद रामचंद्र कुंभार (१८ लाख रुपये), दिनकर भाऊसाहेब कुंभार (एक लाख ५६ हजार २६० रुपये), बाळासाहेब यशवंत कुंभार (७९ हजार रुपये), महादेव पांडुरंग कुंभार (१८ लाख १० हजार ६६० रुपये), मौजे कोडोली (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग गणपती कुंभार (३ लाख एक हजार सहाशे रुपये) या कुंभारांना दंडाच्या नोटिसा बजावल्या. गावातील कुंभारांचे वर्षाचे उत्पन्नदेखील १८ लाख होत नाही. असे असताना एवढ्या रकमेच्या नोटिसा काढल्या. त्यावर केलेले अपीलही प्रांत अधिकाऱ्यांनी फेटाळले, तर काहींच्या सात-बारावरही बोजे चढविले.

Web Title: Kolhapur News Notices of tax evasion to potter professionals