लाईन बाजार येथील प्रस्तावित जैव कचरा प्रकल्पाला विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कसबा बावडा  - लाईन बाजार येथील प्रस्तावित जैव कचरा प्रकल्पाला विरोध असतानाही तो लादला तर जनआंदोलन उभारू, महानगरपालिका व संबंधित कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा नागरिकांनी व मेडिकल असोसिएशनच्या वकिलांनी जनसुनावणीत दिला.

कसबा बावडा  - लाईन बाजार येथील प्रस्तावित जैव कचरा प्रकल्पाला विरोध असतानाही तो लादला तर जनआंदोलन उभारू, महानगरपालिका व संबंधित कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा नागरिकांनी व मेडिकल असोसिएशनच्या वकिलांनी जनसुनावणीत दिला. पांडुरंग गोविंद उलपे सभागृहात झालेल्या जनसुनावणीत हा इशारा देण्यात आला. या वेळी प्रकल्पाविरोधात १९९ हरकती दाखल झाल्या.

महानगरपालिका व एस. एस. सर्व्हिसेस कंपनीतर्फे लाईन बाजार येथे जैव कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. यासंबंधी आज जनसुनावणी झाली. समितीचे अध्यक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे बोलत असताना नागरिकांनी हा प्रकल्प रद्दच करा, असे म्हणत प्रचंड विरोध केला. श्री. शिंदे यांच्या टेबलासमोर नागरिक आक्रमक झाले. या वेळी गोंधळ झाला.

कंपनीतर्फे प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यात अनेक चुका नागरिकांनी निदर्शनास आणल्या. माजी महापौर स्वाती यवलुजे यांनी आक्रमकपणे विरोध दर्शवला. नगरसेवक अशोक जाधव म्हणाले, ‘‘मोठा प्रकल्प होत असताना सभागृहात सादरीकरण करून परवानगी घेणे अपेक्षित होते, पण थेट माथी मारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध आहे.’’

नगरसेविका माधुरी लाड म्हणाल्या, ‘‘या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आहे. तरी सुद्धा असे प्रकल्प बावडेकरांच्या माथीच का?’’ 

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘२०१५ ला या प्रकल्पाला मंजुरी दिली, मग हरकती का घेता. या प्रकल्पाची जागा चुकीची आहे, तसेच हवा, पाणी यांच्या प्रदूषणाचा नागरी जीवनावर होणारा परिणाम फैलावणारे रोग, याबाबत अहवालात चुकीची माहिती आहे.

सतीशचंद्र कांबळे, दिलीप देसाई, चंद्रकांत घाडगे, राहुल मगदूम, ॲड. सतीश वेटाळे, योगेश निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, किसन पडवळे, लक्ष्मण गायकवाड, अतुल परब, संजय लाड, खंडेराव घाडगे, अशोक भासले आदी उपस्थित होते.

प्रकल्प चुकीचा; मेडिकल असोसिएशन
मेडिकल असोसिएशनतर्फे ॲड. आनंदा चव्हाण यांनी प्रकल्पातील तांत्रिक मुद्दे सांगितले. खासगी कंपनीतर्फे अहवाल तयार करून घेतला. त्यात अनेक चुका आहेत. प्रकल्पापासून दहा किलोमीटरच्या आत दवाखाने, संरक्षित स्थळे, ऐतिहासिक स्थळे, नदी, मानवी वस्ती नाही असे नमूद केले, मग लाईन बाजारमधील लोक कोठे राहतात, शाहू जन्मस्थळ, नवीन राजवाडा, अंबाबाई मंदिर, नदी ही ठिकाणे कोठे आहेत? असा सवाल प्रदूषण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी विचारला.

माजी महापौर यवलुजे आक्रमक
माजी महापौर स्वाती यवलुजे यांनी आक्रमक भावना मांडल्या. मी या भागाची नगरसेविका आहे, मी महापौर होते. तरीसुद्धा या प्रकल्पाविषयी मला काहीच माहीत नाही, आताचा प्रकल्प प्रशासनाला दिसत नाहीत का? अहवालात येथे नागरी वस्ती नाही, असे नमूद केले आहे. मग येथे जनावरे राहतात काय? असा सवाल त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News oppose to Bio waste project