पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रांतांकडून कालबद्ध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम दिला आहे.

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. ५ फुेब्रवारीपर्यंत ७६ एमएलडी सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करा, १५ मार्चपर्यंत सीपीआर व राजहंस प्रेस नाला जयंती नाल्याला जोडणे, दुधाळी नाल्यावरील एसटीपीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा आदींसह महत्त्वाच्या सूचनांसह कालबद्ध कार्यक्रम दिला असून या कामात कसूर झाल्यास महापालिकेवर व इचलकरंजी नगरपालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना तसेच इचलकरंजी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, त्यांच्यावर कारवाईसाठी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने करवीर प्रांताधिकारी, तसेच इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर झालेल्या सुनावणीअंती करवीर प्रांताधिकाऱ्यांनी अंतरिम आदेश दिला असून महापालिका व इचलकरंजी पालिकेला कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. या काळात प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे आहेत.

थोडक्‍यात महत्त्वाचे...

  •  महापालिकेने ७२ तासांत जयंती पंप स्टेशन ते प्रक्रिया प्रकल्प वाहिनी जोडावी.

  •  सीपीआरचा नाला जयंती नाल्यास १५ मार्चपर्यंत जोडावा.

  •  दुधाळी नाल्यावरील एसटीपीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत कार्यान्वित करावे.

  •  नदीत वाहने, जनावरे, कपडे धुणे, आंघोळ करण्यावर निर्बंध आणावे.

पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, बुऱ्हान नायकवडी यांनी तक्रार दिली असून ही तक्रार महापालिका आयुक्त, उपायुक्त पाणीपुरवठा, मुख्य आरोग्याधिकारी, महापालिका, पर्यावरण अधिकारी, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या विरोधात केली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला कालबद्ध कार्यक्रम असा
१) ७२ तासांत कोल्हापूर महापालिकेने जयंती पंप स्टेशन ते प्रक्रिया प्रकल्प मुख्यवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण करावे.
२) जयंती नाल्यातील तरंगणारे पदार्थ तातडीने व नियमित काढावेत.
३) लाईन बाजार पंपिग स्टेशन जॅकवेल तसेच बापट कॅम्प नाला बंधारा कामे पूर्ण करून २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू करावे.
४) सीपीआरचा नाला जयंती नाल्याला जोडण्याचे काम १५ मार्चपर्यंत पूर्ण करावे.
५) दुधाळी नाल्यातील सांडपाण्यास निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर तातडीने व नियमितपणे टाकावे.
६) दुधाळी नाल्यावरील एसटीपीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत कार्यान्वित करावे.
७) रंकाळा पाणलोट क्षेत्रातील सर्व शौचालये ३१ मार्चपर्यंत  ड्रेनेज वाहिनीस जोडावीत.
८) नदीत वाहने, जनावरे, कपडे धुणे, आंघोळ करणे यावर पूर्णत: निर्बंध आणून पर्यायी व्यवस्था तयार करा. 
९) जैव व वैद्यकीय कचऱ्याबाबत हॉस्पिटल, दवाखाने, प्रयोगशाळा, रक्तपेढी, जनावरांचे दवाखाने नोंद करणे, कचरा संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट व सांडपाणी, मैला, रक्त आदीवर प्रक्रिया केंद्र २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत उभा करणे.
१०) कत्तलखान्यातील कचरा व द्रव पदार्थ यावर ७२ तासांत प्रक्रिया करण्याचा नवीन प्रकल्प कार्यान्वित करा.
११) घनकचरा संकलन व प्रक्रिया नियमाप्रमाणे २८ फेब्रुवारी २०१८ अखेर करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue