राणेंच्या समितीकडून मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ - प्रकाश आंबेडकर

सुनील पाटील
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

पंढरपुर येथील टिळक स्मारक मैदान येथे 20 मे ला धनगर समाज आणि भारिप बहुजन महासंघाच्यावतीने "सत्तासंपादन निर्धार मेळावा' घेतला जाणार आहे. आमदार गणपतराव देशमुख हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आहेत. याची माहिती देण्यासाठी अॅड. आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर प्रेस क्‍लब कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अॅड. आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. यामध्ये नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला आहे. त्याच पध्दतीने धनगर समाजासाठी दिल्या जाणाऱ्या आरक्षणासाठी नियुक्त असणाऱ्या समितीने किंवा संस्थेने आपला अहवाल देवू नये. ज्या संस्थेकडे अहवाल तयार करायची जबाबदारी दिली आहे, त्या समितीलाही भरवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे, हे सरकार गेले तरीही हा रिपोर्ट होईल की नाही, अशी शंका आहे. 

ज्या संस्थेकडे धनगर समाजाच्या आरक्षण तयार करण्याची जबाबदारी आहे. त्या संस्थेचा अहवाल लोकांसमोर मांडला पाहिजे. त्याचा खेळखंडोबा होता कामा नये. आतापर्यंत फुटबॉल सारखा हा विषय कधी कॉंग्रेस तर कधी भाजपकडे दिला जात आहे. आत हे सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांकडून फसवणूक 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न व धनगराऐवजी धनगड झाले आहे, त्याची दुरूस्ती करण्याची ग्वाही दिली होती. पण या प्रश्‍नाची सोडवणूक केली नाही. खुद्द मोदी यांनीच या समाजाची फसवणूक केली आहे. 

धनगर-लिंगायत समाजात तेढे : 
सोलापूराच्या विद्यापीठाचा वाद नसताना, वाद निर्माण झालेला दिसत आहे. 5 नोव्हेंबर 2017 ला नागपूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एक समिती नियुक्त करण्यात आली. त्याच्या माध्यमातून या विद्यापीठाला बसवेश्वरांचा नाव देण्याचा निर्णय घेतला.

धनगर आणि लिंगायतांमध्ये कधीही वाद नव्हता तो आता सुरू झाला आहे. यानंतर अहिल्याबाई होळकरांचे नाव दिले तर दंगल होण्याची शक्‍यता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त करून या वादामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे. तावडे यांचे हे चिथावणीखोर विधान आहे. अहिल्याबाईचे कार्य सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र त्यांच्या नावाने कुठेही वादंग उठलेले नाही. ही अहिल्याबाईंची बदनामी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस जाणकार आहेत. हुशार आहेत ते किंवा विनोद तावडे यांनी इतिहासातील व्यक्तीचा अपमान केला आहे. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांनी त्यांचे राजकारण पाहिले. समाजा-समजामध्ये भांडण लावण्याचे काम केले आहे. तावडे यांनी धनगर समाजाची माफी मागितली पाहिजे, असेही आव्हान केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Prakash Ambedkar Press