रंकाळा होणार पाणथळ म्हणून घोषित

प्रमोद फरांदे
गुरुवार, 31 मे 2018

कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा आता पाणथळ म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारच्या पर्यावरण विभागाने महापालिका आणि कृषी विभागाला पत्र पाठवून शेतकऱ्यांचे अभिप्राय मागविले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कोणता फायदा अथवा तोटा होणार, याबाबत कोणतीही माहिती या पत्रात नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन शासनाला केले आहे.

कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा आता पाणथळ म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारच्या पर्यावरण विभागाने महापालिका आणि कृषी विभागाला पत्र पाठवून शेतकऱ्यांचे अभिप्राय मागविले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कोणता फायदा अथवा तोटा होणार, याबाबत कोणतीही माहिती या पत्रात नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन शासनाला केले आहे.

मानवनिर्मिती तळी पाणथळ प्रदेशात समाविष्ट करता येत असल्याने कोल्हापूरचा रंकाळा तलाव, ठाण्यातील वऱ्हाळ देवी तलाव, मुंबईतील पवई तलाव, नागपूरचा फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, कोराडी तलावाचा पाणथळ प्रदेश (वेटलॅंड)मध्ये समावेश होणार आहे. त्यासाठी शासनस्तरावर तलावांची माहिती घेणे सुरू आहे. विभागीय कृषी सहसंचालकांना या तलावांबाबत शेतकऱ्यांच्या हितसंबंधावर होणारे परिणाम विचारात घेऊन तलावाचे क्षेत्र वेटलॅंड घोषित करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाचे अभिप्राय मागविले आहेत. कृषी विभागाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे याबाबत माहिती विचारणा केली. महापालिकेच्या माहितीनुसार रंकाळ्यात ४३ लाख ५० हजार १४१ घनमीटर इतका पाणीसाठा होतो.

पर्यावरण साखळी सुरक्षित राहण्यासाठी पाणथळ प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतात. पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती दूषित पाणी व हानिकारक घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. काही वनस्पतींच्या मुळांपासून वीजनिर्मितीही करता येते. मासेमारी करता येते. तज्ज्ञांच्या मते पाणथळ प्रदेशामुळे भारतातील ४७ टक्के वनस्पती, प्राणी, पक्षीसंपदा सुरक्षित राहतात. 

कोल्हापूरच्या रंकाळ्यावर पिन टेल, कॉनम टिल, पाणकावळे, सॅंडपायपर, शेकाट्या, गार्गनी, नकटा, शिकारी पक्षी मार्शहॅरिअर अशा विविध पक्षांचे अस्तित्व आढळते; मात्र हल्ली वाढते प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आदी कारणांमुळे रंकाळ्यावरील हे पक्षीवैभव कमी होत आहे. तलावाचा पाणथळमध्ये समावेश झाल्यास पाणवनस्पतींची वाढ होऊन पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर खाद्य मिळेल. गवतात अंडी घालता येतील. त्यामुळे पक्षांची संख्या वाढून पक्षी वैभव अधिक वाढू शकते. रंकाळ्यात विशिष्ट वनस्पतींना वाढवून दूषित पाणी शुद्ध करता येईल. तेथे तलावालगतच्या कवटासारख्या औषधी वनस्पतींचे संगोपन व संवर्धन करता येईल.

पाणथळ सरोवराची किमया
राजस्थानातील चिल्का सरोवरात १२ हजार टन मत्स्य उत्पादन होते. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांची उपजीविका या पाणथळ सरोवरातून होते. 

रंकाळा पाणथळ म्हणून घोषित केल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तलावात जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद करावे लागेल. त्यामुळे पाणी स्वच्छ राहील व केंदाळ वाढणार नाही. पाणपक्षी मोठ्या प्रमाणावर येतील.
- डॉ. प्रकाश राऊत,
पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

तलावात पक्ष्यांना मुबलक खाद्य मिळेल, सुरक्षित जागा मिळाल्याने पक्ष्यांची संख्या वाढेल. साहजिकच कोल्हापूरच्या पक्षी वैभवात भर पडेल.
- अनिल चौगुले,
पक्षी निरीक्षक

Web Title: Kolhapur News Rankala declared as a wetlands