‘शिवशाही’ महामंडळाला ओझेच

निवास चौगले
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कोल्हापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या अालिशान, वातानुकूलित ‘शिवशाही’ बस म्हणजे महामंडळावर ओझेच आहेत. कर्मचारी संघटनेचा विरोध डावलून घेतलेल्या या बसेसचा व्यवहार हा तोट्याचा आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने हा व्यवहार कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कोल्हापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या अालिशान, वातानुकूलित ‘शिवशाही’ बस म्हणजे महामंडळावर ओझेच आहेत. कर्मचारी संघटनेचा विरोध डावलून घेतलेल्या या बसेसचा व्यवहार हा तोट्याचा आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने हा व्यवहार कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

खासगी बस वाहतुकीला शह देण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षी एसटीच्या ताफ्यात भाड्याने ‘शिवशाही’ बस घेतल्या. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून निविदा मागवून या गाड्या घेतल्या. अतिशय सुंदर, वातानुकूलित यंत्रणा आणि ‘नॉन स्टॉप’ प्रवास हे गाडीचे वैशिष्ट्य आहे. राज्यात १५०० गाड्या तर ५०० गाड्या एसटी महामंडळाने खरेदी केल्या. कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई यांसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्या धावत आहेत. यासाठी राज्यातील काही ठराविक मार्ग निश्‍चित केले. ज्या मार्गावर खासगी आराम बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, त्या मार्गावर या बसेस सोडल्या जातात. 

राज्यात एसटी महामंडळाचे बस बांधणीचे तीन कारखाने आहेत. औरंगाबाद, नाशिक व पुणे येथे हे कारखाने आहेत.  या कारखान्यांतील कामगारांना काम नाही, भाड्याने घेतलेल्या गाड्यापेक्षा चांगल्या गाड्या या कारखान्यात बांधल्या जातील असा कर्मचाऱ्यांना विश्‍वास आहे; पण याकडे दुर्लक्ष करून भाड्याने गाड्या घेतल्या. हा व्यवहार करतानाच कर्मचारी संघटनेने त्याला विरोध केला होता. एशियाड बसच्या धर्तीवर महामंडळाने एक तर अशा गाड्या खरेदी कराव्यात किंवा त्या महामंडळाच्या कारखान्यात बांधून घ्याव्यात, अशी मागणी संघटनेची होती; पण हे सर्व डावलून घेतलेल्या या गाड्या आता डोईजड होत असल्याचे वास्तव आहे. 

या गाडीच्या भाड्यापोटी संबंधित ठेकेदाराला प्रति किलोमीटर १८ रुपये याप्रमाणे भाडे द्यावे लागणार आहे. याव्यतिरिक्त गाडीला लागणारे इंधन, त्यावरील कंडक्‍टर आणि रस्त्यावरील टोलचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार आहे. ठेकेदार फक्‍त या गाडीला चालक देणार आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर कोल्हापूरहून रविवारी रात्री निघणाऱ्या व मुंबईहून शनिवारी रात्री येणाऱ्या ‘शिवशाही’ला मिळणारा चांगला प्रतिसाद सोडला; तर या मार्गावरील या बसची वाहतूक महामंडळाला खड्ड्यात घालणारीच आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावरील प्रवासासाठी या गाडीला चांगला प्रतिसाद असला, तरी त्यातही तोट्याचा व्यवहार जास्त आहे. अगोदरच अर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाच्या दृष्टीने या ‘शिवशाही’ म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी, बारा आण्यांचा मसाला’ अशीच स्थिती आहे. 

संघटनेचा विरोधच होता - हनुमंत ताटे
शिवशाही बसेस भाड्याने घेण्यास सर्वच कर्मचारी संघटनांचा विरोधच होता. या बसचे काही मार्ग फायद्यात असले, तरी बहुंताशी मार्गांवर या बसमुळे महामंडळालाच मोठा तोटा होत आहे. कोल्हापूर-मुंबई बस रोज हाऊसफुल्ल नसते, शनिवार, रविवार सोडला तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यापेक्षा महामंडळाच्या कारखान्यातून बसची बांधणी करून घ्यावी असे आमचे म्हणणे होते; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी काल सांगितले.

दृष्टिक्षेपात शिवशाही

  •  कोल्हापूर- ‘शिवशाही’चे उत्पन्न 
  •  आसन क्षमता - ४५ 
  •  तिकीट दर - ६२० रुपये
  •  मिळणारे उत्पन्न - ५५,८०० रुपये (येता-जाता, बस फुल्ल असेल तर) 
Web Title: Kolhapur News Shivshahi bus issue