क्रीडा संकुलाचे दुखणे कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  रेसकोर्स नाक्‍यावरील विभागीय क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन होऊन सुमारे अडीच वर्षे झाली तरी संकुलाचे मूळ दुखणे कायम आहे. पावसाचे मैदानात साचणारे पाणी, जलतरण तलावाच्या परिसरात वाढलेले गवत व दुधाळी शूटिंग रेंजचे अपुरे काम, अशा वातावरणात खेळाडूंचा सराव सुरू आहे. पंधरा कोटी खर्च करूनही सुविधा उपलब्ध नाहीत. दहा मीटर शूटिंग रेंजसाठी एकही निविदा पात्र न ठरल्याने पुन्हा निविदा मागविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

संकुलाचे काम २००९ला सुरू होऊनही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा वर्गवारीत कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. संकुलात केवळ इमारती उभ्या राहिल्या असून, तेथे दरवाजे, खिडक्‍या बसविलेल्या नाहीत. चेंजिंग रूमची सोय नसल्याने नाराजी व्यक्त होते. या संकुलाचे घाईगडबडीत उद्‌घाटन ५ मार्च २०१५ला करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संकुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतर वर्षभरात चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील, असे सांगितले गेले. 

दादांचा प्रत्येक कामातील धडाका पाहता संकुलाचे काम पूर्णत्वास लवकरच येईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात अडीच वर्षे होऊन संकुलाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. शालेय क्रीडा स्पर्धांचा नारळ संकुलात फोडण्याचा सोपस्कार दरवर्षी पूर्ण करण्यात येतो. स्पर्धेवेळी मुलांना पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. मुख्य म्हणजे खेळाडूंसाठी संकुलात अजूनही स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नाही. आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शूटिंग रेंजचे काम विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देऊनही ते पूर्ण झालेले नाही. दरवेळी कारणांचा पाढा वाचण्याचा क्रम सुरू आहे. दहा मीटर शूटिंग रेंजच्या साहित्यासाठी निविदा मागविल्या होत्या. एकही निविदा निकषांची पूर्तता करू न शकल्याचे सांगण्यात येत असून, आता नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा 
मुख्य दरवाजातून आता प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. दोन एकर जागेत खेळाडूंसाठी वसतिगृह व बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येणार आहे; पण त्याचे काम नक्की कधी सुरू होईल, याची क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा आहे. 
संकुलाचे काम सुरू होऊन आठ वर्षे झाली आहेत. पंधरा कोटींचा खर्च झाला आहे. तरीही संकुल पूर्णत्वास आलेले नाही. डॉल्बी बंदीसाठी पालकमंत्र्यांनी तत्परतेने पावले उचलली. तशी संकुलाच्या पूर्णत्वासाठी ते कधी उचलणार, असा प्रश्‍न क्रीडाप्रेमींतून उपस्थित होत आहे.

Web Title: Kolhapur News Sport Complex Deterioration