‘रविवारची सुटी’ झाली १२८ वर्षांची !

प्रमोद फरांदे
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - सत्यशोधक विचारांच्या मुशीतून घडलेले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी सातत्याने लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला. रविवारची सुटी देण्यास त्यांनी ब्रिटिश सरकार आणि गिरणीमालकांना भाग पाडले. १० जून १८९० पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू झाली. त्याला आज १२८ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे आजच्या लोकशाही पद्धतीचा मार्ग लोखंडेंनी त्या काळात अवलंबून कामगारांना न्याय मिळवून दिला होता. 

अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा केवळ धार्मिकच नव्हे सर्वच प्रकारच्या शोषणाला विरोध होता. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या अनिर्बंध शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे हक्क, न्यायासाठी लढा उभारला. अनेक दाखले देत लोखंडेंनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीसाठी कसा योग्य आहे, हे सरकारला पटवून दिले. लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा पाहून अखेर १० जून १८९० मध्ये गिरणीमालकांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीचा ठराव पास केला आणि कामगारांना साप्ताहिक सुटी लागू झाली. 

सरकारवरही टीका
लोखंडेंनी लढे उभारून न्याय मिळवून देताना कुठेही हिंसक मार्ग अवलंबिला नाही की कामगार दंगलीस प्रवृत्त होतील, असे कोणतेही कृत्य केले नाही. उलट कोणी तसा प्रयत्न केल्यास लोखंडेंनी जाहीररीत्या त्यांची कानउघाडणी केली. कामगारांच्या हक्क आणि न्यायाबाबत सरकारनेही चालढकल झाल्याने लोखंडेंनी ब्रिटिश सरकारवरही अनेकदा कडक शब्दांत ‘दीनबंधू’मधून टीका केली व त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यासाठी त्यांनी परिणामांची पर्वा कधीही केली नाही.

लोखंडे यांच्या कार्याची कोणत्याही पातळीवर म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही. त्यांचे कामगारांविषयीचे कार्य पुढे येणे गरजेचे आहे.
- डॉ. अशोक चोपडे,
पुरोगामी विचारवंत (वर्धा)

Web Title: Kolhapur News Sunday Holiday 128 years old