चला...आडवाटेवरचं कोल्हापूर जाणून घ्यायला...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी दोनदिवसीय मुक्कामी सहल निवास, भोजन व्यवस्थेसह मोफत होणार आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, ‘हिल रायडर्स’चे प्रमोद पाटील, निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी दोनदिवसीय मुक्कामी सहल निवास, भोजन व्यवस्थेसह मोफत होणार आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, ‘हिल रायडर्स’चे प्रमोद पाटील, निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.गायकवाड म्हणाले,‘‘या सहलीसाठी www.unexploredkolhapur.com वर नोंदणी आवश्‍यक आहे. हिल रायडर्स फौंडेशन, ॲक्‍टिव्ह चॅरिटेबल ट्रस्टने सहलीचे आयोजन केले आहे. हॉटेल मालक संघ, विविध संघटना, तज्ज्ञ मार्गदर्शक, बचत गटांचे सहकार्य लाभले आहे. १३ एप्रिलपासून २६ मेदरम्यान प्रत्येक शुक्रवार-शनिवार-रविवार अशा १४ सहली होतील. यात कुटुंब, फक्त पुरुष, फक्त महिला अशा गटांत विभागणी केली असेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य 

यानुसार १०० व्यक्ती एका सहलीत सहभागी होतील. सहलीत स्थानिक बचतगटाद्वारे स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी भोजन, डॉर्मेटरी स्वरूपात राहण्याची सुविधा दिली जाईल. ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. पर्यटकांची निवड करण्याचे अधिकार संयोजकांकडे राहतील. 

हिलरायडर्सचे श्री. पाटील म्हणाले, ‘‘हिल रायडर्स आणि सहयोगी संस्थांनी कोल्हापूर परिसरात गेली अनेक वर्षे शिबिरे, उपक्रम, भटकंती दरम्यान अभ्यासलेल्या या ठिकाणांना पर्यटनाच्या निमित्ताने लोकांसमोर आणून त्या भागाचा विकास व्हावा, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. संकेतस्थळावर नोंदणी करण्यास काही अडचणी आल्यास समित ॲडव्हेंचर्स, पर्ल हॉटेल जवळ ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी समन्वयक उपलब्ध आहेत.’’ विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, ॲक्‍टिव्ह चॅरिटेबलचे सुजय पित्रे, सचिव राहुल कुलकर्णी, चारुदत्त जोशी उपस्थित होते.

शुक्रवार                  १३ एप्रिल         फक्त पुरुष
शनिवार                  १४ एप्रिल         फक्त महिला
शुक्रवार                  २० एप्रिल         फक्त पुरुष 
शनिवार                  २१ एप्रिल         फक्त महिला
शुक्रवार                  २७ एप्रिल         सहकुटुंब
शनिवार                  २८ एप्रिल         फक्त पुरुष
शुक्रवार                  ४ मे               फक्त पुरुष 
शनिवारी                 ५ मे               फक्त महिला
शुक्रवार                 ११ मे             फक्त पुरुष 
शनिवार                 १२ मे             फक्त महिला
शुक्रवार                 १८ मे             सहकुटुंब
शनिवार                 १९ मे             फक्त पुरुष
शुक्रवार                 २५ मे            फक्त महिला
शनिवार                 २६ मे            सहकुटुंब

या स्थळांचा समावेश...
सहलीत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, सातवाहन, यादव, छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीतील अनेक वारसा स्थळे, शिलालेख, गुहा, वास्तू, गड, मंदिरे, युद्धभूमीचा समावेश असेल. जंगलात निवास, नदीकाठ, धरणांचे जलाशय, देवराई, रानमेव्याचा आनंद घेत निसर्गभ्रमंती करता येईल. शिवाय निरभ्र आकाश दर्शनासह जंगल ट्रेक, लोककलेचा अनुभव पर्यटकांना मिळेल. स्थानिक पदार्थ, मसाले, वस्तूंचीही खरेदी करता येईल. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्‍यांचा यात समावेश असेल.

सहलींची वैशिष्ट्ये अशी

  •  राधानगरी जंगलातून प्रवास, निवास
  •  राष्ट्रीय अभयारण्याचा अनुभव
  •  ६०० पैकी १०० किलोमीटर जंगलातून प्रवास
  •  तीन किलोमीटर जंगल ट्रेक अनुभव
  •  रोमांचकारी युद्धभूमीच्या परिसराला भेट
  •  रानमेवा चाखण्याची संधी
  •  चक्रेश्‍वरवाडीजवळ ३६० डिग्रीमधील खुल्या आकाशाचे निरीक्षण
  •  शाकाहारी जेवण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Tracking progamm to Know Kolhapur