प्रतिभाचा काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

अमृता जोशी
मंगळवार, 20 मार्च 2018

कोल्हापूर - सायकलिंग, गिर्यारोहण तसेच मैदानी खेळांमध्ये अनेक तरुणी, महिला विविध उच्चांक प्रस्थापित करत आहेत; तरीही विविध कारणांमुळे आजही असंख्य महिला माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर फारशा कधी खेळतच नाहीत. यासाठी महिला सक्षमीकरण, महिलांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने पुणे येथील प्रतिभा ढाकणे यांनी जम्मू-काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सायकल चालविण्याचा निश्‍चय केला. 

कोल्हापूर - सायकलिंग, गिर्यारोहण तसेच मैदानी खेळांमध्ये अनेक तरुणी, महिला विविध उच्चांक प्रस्थापित करत आहेत; तरीही विविध कारणांमुळे आजही असंख्य महिला माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर फारशा कधी खेळतच नाहीत. यासाठी महिला सक्षमीकरण, महिलांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने पुणे येथील प्रतिभा ढाकणे यांनी जम्मू-काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सायकल चालविण्याचा निश्‍चय केला. 

भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंतचे तीन हजार सातशे किलोमीटरचे अंतर पार करणे हे निश्‍चितच खडतर. ३३ वर्षीय सायकलस्वार प्रतिभा यांनी मात्र हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. २४ फेब्रुवारीपासून दररोजचे १२५ ते १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत त्यांनी कन्याकुमारीच्या दिशेने कूच केली. 

अशोक खळे यांना आदरांजली
प्रतिभा यांनी ‘खेलेंगी बेटियाँ, जितेगा इंडिया’, ‘रिस्पेक्‍ट दि सायकलिस्टस्‌’, ‘वुमन एम्पॉवरमेंट’ला ही मोहीम समर्पित केली आहे. तसेच, आपले सायकलिंगमधील आदर्श ‘घाटाचा राजा’ म्हणवले जाणारे आणि सायकलिंग करताना अपघाती मृत्यू आलेले अशोक खळे यांना या मोहिमेद्वारे आदरांजली वाहिली आहे. 

सोबत मदतीला कोणतेही वाहन नाही. गिअरची सायकल, हेल्मेट, नी-गार्ड, एल्बो गार्ड, हॅन्ड ग्लोव्हज्‌, रिपेअर किट, हवा भरण्याचा पंप, पॅचेस, मोजके कपडे एवढ्या साहित्यासह मोहिमेला सुरुवात केली. जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मुंबई, पुणे या मार्गाने प्रवास करत १८ मार्चला त्यांनी कोल्हापूरला भेट दिली. येथील परमाळे सायकल्सतर्फे त्यांचा सत्कार झाला.   

प्रतिभा यांना मैदानी खेळ, गिर्यारोहण, सायकल चालविण्याची आवड लहानपणापासूनच होती. मात्र, तिशी पार केल्यानंतर आपली लहानपणीची आवड जपणाऱ्या लहानपणीइतक्‍याच उत्साहाने त्यात उतरून वेगळेपण सिद्ध करणाऱ्या महिला क्वचितच आढळतात. ३३व्या वर्षी प्रचंड जिद्दीसह त्यांनी भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत ‘सायकल की सवारी’चा निश्‍चय केला. त्यांच्या चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे तीन हजार सातशे किलोमीटर अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे प्रचंड वाटणारे आव्हान खुजे ठरले.

आरोग्याच्या दृष्टीने सायकल उपयुक्त आहे. सायकलमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. मात्र, एखादा सायकलस्वार रस्त्याने सायकल चालवत असतो, त्यावेळी त्याच्याकडे कोणी आदराने पाहत नाही. उलट दुचाकी, चारचाकीवाले, बस-ट्रक ड्रायव्हर त्याच्या रस्त्यात आडवी गाडी घालणे, धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे असे प्रकार करतात. सायकलस्वारही रस्त्यावरील एक घटक आहे. ‘रिस्पेक्‍ट दि सायकलिस्ट’ हेही मी माझ्या मोहिमेचे ब्रीदवाक्‍य ठेवले आहे. 
- प्रतिभा ढाकणे,
सायकलिस्ट

Web Title: Kolhapur News Travel from Kashmir to Kanyakumari on Bicycle