कंटेनरची स्कुलबसला धडक ; तीन ठार

सागर कुंभार
मंगळवार, 26 जून 2018

रुकडी - कोल्हापूर- सांगली महामार्गावर चोकाक-माले फाटा दरम्यान कंटेनर आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कंटेनरमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. 

रुकडी - कोल्हापूर- सांगली महामार्गावर चोकाक-माले फाटा दरम्यान कंटेनर आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कंटेनरमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. सुरेश खोत (कवठेमहांकाळ) आणि सचिन खिलारे (शेनवडे, ता. माण, जि. सातारा ) अशी मृतांची नावे आहेत. तर उपचारा दरम्यान जयसिंग चौगुले ( रा. गडमुडशिंगी ) या स्कुल बस चालकाचे निधन झाले. 

कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे  हातकणंगलेच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसला  कंटेनरची धडक बसली. अपघातात कंटेनरमधील दोघे जागीच  ठार झाले तर स्कूल बसमधील चालक, दोन सेविकांसह २६ विद्यार्थी जखमी झाले.जखमींवर रुकडी येथील डॉ. विजय पवार यांच्या साईनाथ हॉस्पीटलमध्ये प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे. 

दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अतिग्रे ( ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची स्कूल बस ( एम एच ०९ बी सी ३०४९ ) ही गांधीनगरहून विद्यार्थी घऊन शाळेच्या दिशेने येत होती तर कंटेनर कोल्हापूरच्या दिशेने ( एम एच ०९ इ एम ३९३९) भरधाव वेगाने निघाला होता. कंटेनरच्या चालकाचा चोकाक- माले फाटा दरम्यान ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडून त्याने स्कूल बसला जोरदार धडक दिली. यावेळी स्कूल बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग नियंत्रीत करत धडक चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र कंटेनरचा वेग इतका होता की, बसला धडक देवून कंटेनर रस्त्याच्या उलट दिशेला असलेल्या शेतात घुसला. या अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूल मधील इयत्ता १ली ते १०वीच्या २६ विद्याथ्र्यांसह चालक व दोन सेविका जखमी झाल्या. रुकडी येथील मेडिकल असोशिएशनचे डॉक्टर विजय पवार, प्रसन्न पवार, बी ए पाटिल, डॉ. आळतेकर, सचिन घाटगे, स्मीता पवार, धनवंतरी पवार, निलीमा घाटगे, अजित पाटील, हेमावती पाटील, डॉ. बिचकते यांनी जखमींवर तातडीने प्रथमोपचार केले तर रुकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरंपच शितल खोत, ग्रा. पं. सदस्य नंदकुमार शिंगे, शमुवेल लोखंडे, राजू कोळी, राजेश अपराध, सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ यांनी  मदत केली. सुमारे ६ रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने सेवेसाठी दाखल झाल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News two dead in an accident near Chokak