वसुंधरा महोत्सवासाठी ‘पर्यावरणस्नेही सजावट’

अमृता जोशी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  उद्या (ता. १४) पासून सुरू होणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पर्यावरणस्नेही सजावट’ केली आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिरव्यागार वातावरणात ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश या सजावटीतूनही दिला आहे. यासाठी युनाते क्रिएशन्स या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले आहेत.

कोल्हापूर -  उद्या (ता. १४) पासून सुरू होणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पर्यावरणस्नेही सजावट’ केली आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिरव्यागार वातावरणात ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश या सजावटीतूनही दिला आहे. यासाठी युनाते क्रिएशन्स या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले आहेत. ग्रुपमधील शुभम चेचर, पुष्पक पांढरबळे, प्रतीक्षा घनबट्टे, ईशा जोशी, आकाश झेंडे, अनिशा पिसाळ, दुर्गा आजगावकर, अभिषेक संत, प्रसाद राऊत, विजय उपाध्ये, विनायक पाटील, श्रुती पोरे, नकुल काटवडे हे दळवीज्‌ आर्टस्‌चे विद्यार्थी असून त्यांनी आदल्या दिवसापासून कार्यक्रमस्थळी सजावटीस सुरवात केली.

दुर्गा जोशी म्हणाली, ‘‘सजावटीसाठी वापरलेल्या सर्व वस्तू कागद, कापडापासून तयार केल्या. लहान मुलांना भेटवस्तू देण्यासाठी पेपरवेटसाठी वापरण्यात येणाऱ्या नदीतल्या दगडाला रंग दिला आहे. विविधरंगी कापडी झेंडे सजावटीसाठी वापरले. कागदी कटआऊटस्‌पासून नदी, दगड, पाणी, वाळू, माती, प्राणी, जलचर, झाडे बनविले. यातून ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश दिला आहे.’’ 

विजय टिपुगडे म्हणाले, ‘‘प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी तुंबते. यामुळे सजावटीत कागदाचा वापर केला. बॅनर, माहिती पत्रकांसाठी कागद, कापड यांचा वापर केला. यातून प्लास्टिकचा वापर टाळा, हाही संदेश आपोआप मिळत आहे. एकदा तयार केलेल्या फ्लेक्‍स बोर्डचा पुन्हा फारसा वापर होत नाही. यामुळे फ्लेक्‍सचा बोर्डचा वापर टाळला. यामुळे साईन बोर्ड रंगवणाऱ्या पेंटरना पुन्हा काम मिळाले. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापरही केला.’’ छायाचित्र प्रदर्शनात राज्यभरातून छायाचित्र स्पर्धेत सहभागी झालेल्या छायाचित्रकारांनी कॅमेराबद्ध केलेल्या ८० कलाकृती मांडल्या आहेत. या कलाकृतीही नदी वाचवा, जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित आहेत. तसेच ‘सकाळ’तर्फे राबविलेल्या ‘चला पंचगंगा वाचवूया’ या अभियानावेळी विजय टिपुगडे यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या कलादालनात आहे.’’

सजावटीत तसेच मुख्य दरवाजापासून ते स्टेजपर्यंत कुठेही प्लास्टिकचा वापर नाही. पाण्यासाठी तांब्याचे भांडे वापरले जाईल. रिफ्रेशमेंटसाठी कागदी प्लेटस्‌, पेयांसाठी कागदी ग्लासचा वापर होईल. बुके, हार, तुरे यांच्याऐवजी छोट्या बाऊल टाईप मातीच्या कुंड्यांचा वापर केला जाईल. विविध पारितोषिकांसाठी दिली जाणारी सन्मानचिन्हे चेतना विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहेत. हॅंडमेडमुळे खर्च वाढला असला तरी पर्यावरणाचे नुकसान टळले आहे. तसेच, रोजगार उपलब्धीही झाली. विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘पर्यावरणस्नेही सजावटी’वर डॉक्‍युमेंटरी दाखविण्यात येईल.
- अनिल चौगुले, संयोजक 

Web Title: kolhapur news Vasundhara Mahotsav