व्हीआयपींचे विश्रामगृह थकबाकी यादीत

सुधाकर काशीद
शनिवार, 10 मार्च 2018

कोल्हापूर - जिथे सगळ्या व्हीआयपींचा मुक्काम असतो अशा शासकीय विश्रामगृहाचा पाणी बिलाच्या थकबाकीपोटी पाणीपुरवठा खंडित करण्याचा आणि थकबाकी भरली नाही तर विश्रामगृहाची वास्तू जप्त करण्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

कोल्हापूर - जिथे सगळ्या व्हीआयपींचा मुक्काम असतो अशा शासकीय विश्रामगृहाचा पाणी बिलाच्या थकबाकीपोटी पाणीपुरवठा खंडित करण्याचा आणि थकबाकी भरली नाही तर विश्रामगृहाची वास्तू जप्त करण्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

प्रत्यक्षात ही कारवाई होईल की नाही हा पुढचा भाग आहे; पण या निमित्ताने ४३ लाख रुपयांचे पाणी कोणी व कधी वापरले, हा मात्र शोधाचा भाग झाला आहे. कारण २०१२ साली चार महिने एक थेंबही पाणी विश्रामगृहासाठी वापरले नसताना त्या काळातील पाणी बिल व त्यावर दंडव्याज आकारलेच कसे गेले ही सार्वजनिक बांधकाम खात्याची भूमिका आहे. अर्थात हे बिल आपण भरणार नाही हेच त्यांनी सूचित केले आहे. यामुळे पाणी बिल आकारणीतील उणिवा ठळक झाल्या आहेत. 

वादग्रस्त थकबाकीची रक्कम वगळता दर दोन महिन्याला ८५ हजार ५०५ रुपयांचे बिल आम्ही नियमित भरतो. त्यात कधीही खंड पडलेला नाही. ४३ लाख रुपये थकबाकीची रक्कम मान्य नसल्याने पत्रव्यवहार सुरू आहे. 
- अविनाश पोळ,
शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ताराबाई पार्कात इंदुमती राणीसाहेबांच्या नावे शासकीय विश्रामगृह आहे. ही वास्तू हेरिटेजच्या यादीत आहे; पण या वास्तूच्या खात्यावर ४३ लाख रुपये इतकी पाणी बिलाची मोठी थकबाकी असल्याचे जाहीर झाल्याने तो कोल्हापुरात चर्चेचा विषय झाला आहे. ज्या वास्तूला इंदुमती राणीसाहेबांच्या दीर्घ वास्तव्याची किनार आहे व ज्या वास्तूत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायाधीश राहू शकतात, अशी वास्तू थकबाकीदारांच्या यादीत असणे ही खूप विसंगती ठरली आहे. महापालिकेनेही अशी वास्तू जप्त करून त्याचा लिलाव केला जाईल, असे टोकाचे सरकारी शब्द नोटिसीत वापरले आहेत. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे वास्तव्य या वास्तूत त्यांच्या मृत्यूपर्यंत होते. इंदुमती राणीसाहेब यांचे पती प्रिन्स शिवाजी यांच्या अपघाती मृत्यूनंतर शाहू महाराजांनी आपल्या सुनेसाठी ही वास्तू दिली. या वास्तूत इंदुमती राणीसाहेब नुसत्या राहिल्याच असे नव्हे तर त्यांनी या वास्तूत इंग्रजी संभाषण, शिवणकला, चित्रकला याचे शिक्षण घेतले. स्वतःचे वाचनालय उभे केले. मुलींच्या शिक्षणासाठी आराखडे तयार केले. किंबहुना ही वास्तू त्यांच्या वास्तव्याच्या काळात वेगवेगळ्या विद्या, कला संस्कृतीचे एक केंद्र ठरली. 

१९७५ साली इंदुमती राणीसाहेबांचे निधन झाल्यानंतर ही वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आली व तेथे विश्रामगृह सुरू झाले. तत्पूर्वी शाहू जन्मस्थळाच्या जागेत शासकीय विश्रामगृह होते. इंदुमती राणीसाहेब वास्तू अशा नावानेच असलेल्या या विश्रामगृहात आता चार व्हीआयपी कक्ष आहेत, तर आवारात तीन नवीन वाढीव विश्रामगृहे, बहुउद्देशीय हॉल बांधला आहे. या विश्रामगृहातील बहुतेक खोल्या रोज आरक्षित असतात. त्यासाठी पाणी, वीज यांचा मोठा वापर होतो.

२०१२ साली रस्ता दुरुस्तीच्या निमित्ताने विश्रामगृहाचा रस्ता चार महिने पूर्ण बंद राहिला. खोदाईमुळे पाणी कनेक्‍शनही बंद राहिले. या काळात विश्रामगृह बंदच ठेवले गेले; पण या बंद काळातले पाणी बिल आकारले गेले. हे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने अमान्य केले व त्याचे थकबाकीत रूपांतर झाले. आता ही थकबाकी ४३ लाखांवर गेली आहे; पण ही थकबाकी आपल्याला लागूच होत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे. तोवर पाणीपुरवठा विभागाने जप्तीची नोटीस दिली आहे. त्यामुळे व्हीआयपी लोकांच्या विश्रामगृहाची वास्तू अडचणीत आली आहे. 

Web Title: Kolhapur News Vip's Resthouse in the Restricted List