कचरा समस्येवर नारीशक्तीची आदर्श पायवाट...

अमृता जोशी
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर -राज्यभरात कचऱ्याची समस्या गाजत आहे. शहर, गावपातळीवर यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सामान्य महिला असामान्य योगदान देत आहेत. त्या घरच्या घरी सेंद्रिय खतनिर्मिती, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, उपयुक्त वस्तू, पुनर्वापर आदी मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यांनी अगदी साध्या-सोप्या उपायांतून वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर कचऱ्याचा प्रश्‍न यशस्वीरीत्या सोडवून आदर्श निर्माण केला. या आदर्शातून प्रेरणा घेत इतरांनीही सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर -राज्यभरात कचऱ्याची समस्या गाजत आहे. शहर, गावपातळीवर यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सामान्य महिला असामान्य योगदान देत आहेत. त्या घरच्या घरी सेंद्रिय खतनिर्मिती, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, उपयुक्त वस्तू, पुनर्वापर आदी मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यांनी अगदी साध्या-सोप्या उपायांतून वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर कचऱ्याचा प्रश्‍न यशस्वीरीत्या सोडवून आदर्श निर्माण केला. या आदर्शातून प्रेरणा घेत इतरांनीही सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे.

जुन्या साड्यांपासून पायपुसणी, दुपटी... - रामेश्वरी पाटील
शिवाजी पेठेतील रामेश्‍वरी पाटील यांनी विणकाम कलेचा वापर करून जुन्या साड्यांपासून पायपुसणी तयार केली आहेत. सलग लांब पट्ट्या कापून त्यापासून ही पायपुसणी बनविली. जुन्या बेडशीटपासून उशी, लोड, तक्के यांचे अभ्रे, गोधड्या, दुपटी आदी अनेक वस्तू तयार केल्या आहेत. त्यांनी टाकाऊ किंवा कचरा ठरणाऱ्या अनेक वस्तूंचा सुयोग्य वापर करून आपल्यातील कलेचे अनेक नमुने तयार केले आहेत. रेडिमेडच्या जमान्यात यापैकी अनेक वस्तू सहज उपलब्ध झाल्याने महिलांमधील विणकामाचे कौशल्य, स्वनिर्मितीचा आनंद कमी झाला. फाटलेल्या साड्या, बेडशीटस्‌ अनेकदा वापर नसल्याने पडून राहतात. याला दमट हवामानात बुरशी, वाळवीही लागते. कचऱ्यात भर पडते. मात्र यापासून तयार झालेल्या उपयुक्त वस्तू चार-पाच वर्षे टिकतात. धुऊन वापरता येतात. दैनंदिन वापरातील आणि वरवर अतिशय साध्या वाटणाऱ्या या वस्तूंमुळे कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने आपोआप एक पाऊल टाकले. अनेक वर्षांत खर्चात मोठी बचत झाल्याचे सौ. रामेश्‍वरी यांनी सांगितले.
- रामेश्‍वरी पाटील, गृहिणी

पर्यावरण जागरातून मुलांवर संस्कार - पुष्पलता पवार
एसएससी बोर्डाच्या प्रभारी अध्यक्ष असलेल्या पुष्पलता पवार जुलै २०१७ ला पदावर रुजू झाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातून ‘पर्यावरण’ विषय कसा शिकवता येईल, यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षकांची शिबिरे, कार्यशाळा आयोजित केल्या. पर्यावरण विषयाला गुण देताना ‘मुलांनी घरी कोणता पर्यावरण प्रकल्प राबविला, त्यातील सातत्य, परिणाम, त्यातील मुलांची आवड, कृतिशील प्रयोग’ यांचा विचार करून गुण देण्याची सूचना केल्या. त्या मुलांवर पर्यावरण संस्कार लहापणापासूनच होणे आवश्‍यक असल्याचे मानतात. बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून त्यांनी कचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविला आहे. एसएससी बोर्डाच्या आवारात पडणारा पालापाचोळा जाळण्याऐवजी त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. यासाठी कंपोस्ट बेड तयार केले. यामुळे प्रदूषण टाळले जाऊन झाडांना खत उपलब्ध होत आहे. आवारातील नारळाच्या झाडांपासून मिळणाऱ्या करवंट्या, शेंड्यांपासून बागेतील झाडांना आळी तयार करून सुशोभीकरणही केले. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असतानाही उपक्रमशील राहण्याचा वसा त्यांनी घेतला. श्रीमती पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कामासोबतच कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक वेगळी वाट कशी चोखाळता येईल, याचे उदाहरण घालून दिले आहे. निवृत्तीनंतर खेडी स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे.
- पुष्पलता पवार, प्रभारी अध्यक्ष, एसएससी बोर्ड

सेंद्रिय खतनिर्मिती; प्लास्टिकचा पुनर्वापर - ज्योती जिनगाैंडा
मंगेशकरनगर, मंगळवार पेठेतील ज्योती जिनगोंडा यांनी भाज्यांची देठे, साली, बिया, टरफले, फुले आदी कचऱ्यापासून घरच्या घरी सेंद्रिय खतनिर्मिती केली आहे. घरातील कुंड्यांमधील झाडे, बागेतील झाडांसाठी या खताचा वापर होत आहे. तसेच प्लास्टिक कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुऊन, साठवून त्यांची पुनर्वापर, पुनर्विक्री करत आहेत. घरातील प्लास्टिक, इलेक्‍ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक कचरा कोंडाळ्यात न टाकता तो साठवून त्याची पुनर्विक्री त्या करत आहेत. आवश्‍यक तितकेच अन्न शिजवणे, गरजेइतकेच ताटात वाढून घेणे, यातून शिळे, उष्टे, खरकटे उरणार नाही याची दक्षता त्या घेतात. अत्यल्प कचरा घंटागाडीत टाकला जातो. या कचऱ्याचेही वर्गीकरण करून ते टाकला जातो. या कामी कुटुंबीयही मदत करतात. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ. ज्योती घरच्या घरी कचरा व्यवस्थापन करून कचऱ्याची समस्या सोडविण्यास हातभार लावत आहेत.
- ज्योती जिनगोंडा, गृहिणी

‘निसर्गाचं देणं पेटी’तून पर्यावरण जागर...- राणिका चाैगुले 
महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ येथील राणिता चौगुले स्वयंपाक घरातील सुक्‍या सेंद्रिय कचऱ्यापासून ‘निसर्गाचं देणं पेटी’च्या माध्यमातून सेंद्रिय खत बनवत आहेत. अनेक धान्ये, वनस्पतींच्या देशी वाणांच्या बिया रुजविण्यासाठी या खताचा वापर केला जातो. यातून रोपवाटिका साकार झाली आहे. त्यांनी नारळाच्या शेंडीपासून भांडी घासण्याचे चोथे; सुकलेली फुले, निर्माल्यापासून रंगपंचमीचे आणि भाज्या, फळांपासून खाण्याचे नैसर्गिक रंग; टेलरिंगमधील कपड्यांच्या चिंध्यांपासून उशा, लोड; प्लास्टिक कॅरीबॅगला पर्यायी रद्दी पेपरच्या कागदी पिशव्या आणि जुन्या साड्या, आहेरातील ब्लाऊज पीसपासून कापडी पिशव्या तयार करत आहेत. बाजारातील भाजीविक्रेत्यांकडे शिल्लक उरलेला नाशिवंत भाजीपाला विकत घेऊन त्यापासून सुकवलेला टोमॅटो, आले, केळी, रताळे, कोथिंबीर व कढीपत्त्याची पावडर आदी साठवणीसाठी तयार केले आहे. सौ. राणिता दररोज सकाळी सायकलवरून घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहोचवतात. त्यांनी या पिशव्या स्वच्छ धुऊन परत करण्याबाबत किंवा साठवून रद्दी म्हणून विक्री करण्याबाबत महिलांचे प्रबोधन केले आहे. या पिशव्या दर आठवड्याला संकलित केल्या जातात. स्वतःपासून सुरुवात करून आता त्या इतरांनाही यासाठी मार्गदर्शन करतात.
- राणिता चौगुले, अध्यक्षा, आदर्श सहेली मंच

 

Web Title: Kolhapur News waste disposal success story