रांगड्या कोल्हापुरी शब्दांची आता होणार ‘डिक्‍शनरी’

Kolhapur-Word-dictionary
Kolhapur-Word-dictionary

कोल्हापूर - ‘साहेब, शहरात जिकडे तिकडे डबरे आहेत, हे डबरे लवकर मुजवा’, असे एक कार्यकर्ता महापालिका आयुक्‍तांना तळमळीने सांगत होता. आयुक्‍तही मान डोलावत होते. पण सारखा सारखा डबरा हा शब्द ऐकून आयुक्‍तांनी त्या कार्यकर्त्याला थांबविले व ‘डबरा’ म्हणजे काय? असे अगदी सहज विचारले. आणि डबरा म्हणजे रस्त्यावरचा खड्डा हे ऐकून गंभीर प्रवृत्तीचे आयुक्‍तही हसू लागले व तुमचे डबरे लवकर भरले जातील, असे उत्तर देऊन मोकळे झाले.

डबरा हा झाला कोल्हापुरी भाषावापरातील एक प्रतीकात्मक शब्द. पण असे अनेक शब्द कोल्हापुरी भाषेत आहेत, की त्यात गोडवा, रग, आपुलकी, कुतूहल आणि खूप मोठा बरा-वाईट अर्थही दडला आहे. अशा कोल्हापुरी शब्दांची एक डिक्‍शनरी तयार होत आहे. कोल्हापूर जरूर बदलते आहे. बदलाचे नवे प्रवाह शहरात येत आहेत. पण मूळ टिपिकल शब्दांचा प्रवाह या बदलत्या वातावरणातही खळाळता आहे. आणि ‘आम्ही कोल्हापुरी’ या फेसबुक ग्रुपचे सदस्य हा खळाळता प्रवाह एका पुस्तकात शब्दबद्ध करणार आहेत. 

दर बारा कोसावर भाषा किंवा भाषेचा टोन बदलत असतो. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. पण, शहरात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, रूढी, परंपरा याची एवढी रेलचेल आहे, की त्यामुळे या भाषेला वेगवेगळ्या क्षणांची आणखी एक किनार आहे. आणि त्यामुळे या भाषेला एक ओघही आहे. अगदी सहजपणे लोक बोलून जातात आणि नवख्या माणसाला बुचकाळ्यात टाकून सोडतात.

‘मातीला जाऊन आलो’ हे हमखास प्रत्येक कोल्हापूरवासीयाच्या तोंडातील वाक्‍य. मातीला जाऊन येणे म्हणजे एखाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये जाणे. वास्तविक, हा दुःखाचा आणि भावनिक प्रसंग. पण, एखाद्याला मातीत घातल्यासारखा त्याचा सहज बोलता-बोलता उल्लेख होतो. एखाद्याला तुम्ही झोपला होता काय? असे विचारले तर नाही लवंडलो होतो, असे उत्तर मिळते. गल्लीतल्या एखाद्या खोडकर मुलाची ओळख ‘गापट’ अशी करून दिली जाते. तिरळ्या डोळ्यांच्या व्यक्‍तीची ओळख ‘कैनं’ म्हणून केली जाते. आश्‍वासने देणाऱ्या पुढाऱ्याला ‘गंडीव फशीव’ अशा शब्दाने ओळखले जाते. एखादे पेय लौकर संपवा, असे सांगायचे झाले तर ‘मारा की टमकन’ असे उघड सांगितले जाते. मारहाणीच्या प्रसंगाची तारीफ ‘बडीवलं तुडीवलं’ अशा शब्दांत केली जाते. शोधा म्हणजे सापडेल या तीन शब्दांना ‘हुडका’ असे एका शब्दात मिटविले जाते. वेगात आलो असे सांगण्याऐवजी ‘तर्राट’ आलो, असे सांगितले जाते. कर्तृत्ववानाला ‘खवन्या’ या शब्दाने गौरविले जाते. चिडलेल्या साहेबाचे वर्णन ‘साहेब पिचकलंय’ अशा शब्दात केले जाते. कायम गंभीर राहणाऱ्याला ‘आंबील’ म्हटले जाते, खूप बोलणाऱ्याला ‘पिळणकर’ पदवी दिली जाते. रुग्णालयात, न्यायालयात एकमेकाला भेटणारेही ‘कसं काय..? निवांत’ असे सहज म्हणून जातात. आणि अनोळखी माणूस असला तरीही त्याच्याशी बोलताना त्याच्या वयानुसार अरे भावा, काका, अहो मामा, अहो ताई, अहो काकी असे स्नेहाचे शब्द एका क्षणात ओठांवर येतात. असे असंख्य शब्द आहेत की त्याची बक्‍कळ यादी आहे. आणि तीच यादी आता तयार होत आहे. कोल्हापूरचे जसे अन्य वैभव आहे तसेच हे शब्दवैभव आहे. आणि शहराची या क्षणाची मानसिकता पाहिली तर आणखी ५० वर्षे तरी त्यातला ताजेपणा जीवंत असणार आहे.

तीन लाख सभासद
‘आम्ही कोल्हापुरी’ या फेसबुक ग्रुपचे तीन लाख सभासद आहेत आणि आठवणीतले असंख्य कोल्हापुरी शब्द या डिक्‍शनरीसाठी त्यांच्या ओठांवर येऊ लागले आहेत.

‘आम्ही कोल्हापुरी’च्या सदस्यांची कोल्हापुरी डिक्‍शनरी करावी, अशी सूचना आहे. कोल्हापुरी रांगड्या शब्दांत खूप अर्थ दडला आहे. डिक्‍शनरीचे काम सुरू आहे.
- आशिष प्रभू , अमित देसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com