सशक्‍तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल
  • जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावानुसार व गुणांकनानुसार प्रथम क्रमांक
  • श्रीनिवास बावा व अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने 7 ते 9 फेब्रुवारी या काळात केली तपासणी. 

कोल्हापूर - पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावानुसार व गुणांकनानुसार प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनिवास बावा व अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने 7 ते 9 फेब्रुवारी या काळात तपासणी केली होती. त्याचा निकाल जाहीर झाला. 

सकाळी जिल्हा परिषदेने राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजनामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करणे, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, डिजिटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशाला, रेकॉर्ड सॉर्टिंग अंतर्गत डिजिटल रेकॉर्ड रूम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस, आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने याचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले होते.

यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशाला, रेकॉर्ड सॉर्टिंग अंतर्गत तयार केलेली डिजिटल रूम आदींची डॉक्‍युमेंटरी दाखविली होती. जिल्हा परिषदेने सेस निधीमधून राबविलेल्या शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ व सर्व खातेप्रमुख व अधिकारी - कर्मचारी यांच्या सहकार्याने पुरस्कारात बाजी मारली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur ZP wins Pandit Dindayal Upadyay award