kolhapur : शिरोळमध्ये घरफोडीत १० लाखांचा ऐवज लुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

burglary

शिरोळमध्ये घरफोडीत १० लाखांचा ऐवज लुटला

शिरोळ : येथील एका बंद घरातून चोरट्याने दिवसाढवळ्या सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, रोख तीन लाख ८० हजार रुपये असा ऐवज पळवून नेला. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने पोलिस खडबडून जागे झाले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भगिनी सुरेखा अण्‍णासाहेब पाटील कुटुंबासह शिरोळ- अर्जुनवाड रस्त्यावरील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट शाळेजवळ राहतात. घरातील सर्वजण नोकरीनिमित्त व कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सुरेखा याही खासदार शेट्टी यांच्या घरी गेल्या होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या स्नुषा नोकरीवरून घरी आल्या. त्या वेळी घराचे कुलूप काढले होते; पण आतून दरवाजा बंद होता. म्हणून त्यांनी हाक मारली. तथापि, कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता तीन ते चार चोरटे त्यांच्या निदर्शनास आले. कोणीतरी आल्याची चाहूल चोरट्यांना लागली. त्यामुळे त्यांनी घराचा मागील दरवाजा उघडून त्यांनी उसाच्या शेतातून पलायन केले.

सूनबाईंना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याची माहिती तातडीने कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच शिरोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रामेश्वर व्यैजने, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक व्ही. बी. कुरणे, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप, सागर पाटील, ताहीर मुल्ला आदींच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले. श्वानपथकही आले होते; मात्र रिमझिम पावसामुळे तपासकार्यात अडथळा आला. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

loading image
go to top