esakal | राज्यातील दीड लाख साखर कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील दीड लाख साखर कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ

राज्यातील दीड लाख साखर कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: राज्यातील दीड लाख साखर कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाने प्रत्येक कारखान्यांवर वर्षाला सरासरी दीड कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. तीन वर्षानंतर ही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

हेही वाचा: जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वीरजवानाचे कुटुंबीय थेट मुख्यमंत्र्यांकडे

दरम्यान, साखर कामगारांचा महागाई भत्ताही २ रूपये ७० पैशांवरून २ रूपये ९० पैसे करण्यात आला. याशिवाय एक अतिरिक्त वेतनावाढही या कामगारांना देण्यात येणार आहे. एका साखर कारखान्याकडे सरासरी ५०० कामगार आहेत. या प्रत्येक कामगाराच्या पगारात नव्या निर्णयाने महिन्याला किमान अडीच हजारांची वाढ होणार आहे. ५०० कामगारांच्या पगारापोटी महिन्याला सुमारे साडे दहा लाख तर वर्षाला दीड कोटी रूपयांची तरतूद कारखाऩ्यांना करावी लागणार आहे.

साखर कामगारांच्या वेतनप्रश्‍नी राज्य शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय समितीची बैठक काल (ता. ९) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात झाली. समितीचे अध्यक्ष व राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीराम शेटे, आमदार प्रकाश आवाडे, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आदि उपस्थित होते.

पुर्वी ज्या कामगारास सात वर्षे, १५ वर्षे व २१ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा टप्प्यावर साखर कामगारांना अतिरिक्त पगारवाढ दिली जाते. या निकषात बदल करताना एक वर्ष कमी करून सहा, १४ व २० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना नव्या वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत झाला.

दरवाढ समर्थनीय- मेढे

तीन वर्षापासून साखर कामगारांच्या पगारात वाढ झाली नव्हती. साखरेचे दरच कमी असल्याने व हमीभावात वाढ न केल्याने कारखान्यांना कर्ज काढून एफआरपी देण्याची वेळ आली होती, त्यामुळे कामगारांच्या वेतनाकडे दुर्लक्ष झाले होते. आता निर्णय चांगला झाला आहे, एकरकमी फरकाची रक्कम देणे बहुंताशी कारखान्यांना शक्य होणार नाही, यावर पर्याय म्हणून दर महिन्याच्या पगारातच काही रक्कम वाढ करून फरक द्यावा लागणार आहे.- पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

loading image
go to top