esakal | जल जीवनमध्ये ‘करवीर’ची १५ गावे IZP
sakal

बोलून बातमी शोधा

जल जीवन मिशन

जल जीवनमध्ये ‘करवीर’ची १५ गावे

sakal_logo
By
कुंडलिक पाटील

कुडित्रे : करवीर तालुक्यातील पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत. यासाठी सुमारे सात कोटींची गरज आहे. मात्र, योजनेत लोकवर्गणीची अट शासनाने घातल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेसाठी कावणे, खेबवडे, कोगील, गिरगाव, येवती, आरळे, बोलोली, शिपेकरवाडी, सावरवाडी, दोनवडे, भामटे, पासार्डे, आरे, आमशी, मांडरे या गावांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यामध्ये रेट्रो फिटिंग योजनेत सुधारणा करणे व अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. डोंगरी भागासाठी पाच टक्के व सर्वसाधारण भागासाठी दहा टक्के लोकवर्गणीची अट आहे.

हेही वाचा: Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

योजना कार्यान्वित झाल्यास पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यापूर्वी गावात प्रतिमाणसी ४० लिटर प्रतिदिन पाणी देण्याची व्यवस्था आहे. आता २०४० मधील लोकसंख्या वाढ गृहीत धरून प्रतिमाणसी ५५ लिटरप्रमाणे पाणी देण्याच्या उद्देशाने या योजना आखल्या आहेत.

लोकवर्गणीची अट त्रासदायक

कोल्हापूर शहराशेजारील गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे वाढीव वस्तीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नळ कनेक्शन नाहीत. काही ठिकाणी पाणी शुद्धीकरण केंद्र नाही. वाढीव वस्ती ठिकाणी पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याची गरज आहे. कोरोना, पूर, अतिवृष्टीमुळे नागरिक, ग्रामपंचायती अडचणीत आहेत. त्यामुळे लोकवर्गणीची अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे.

"या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या आहेत. गावांच्या मागणी व आवश्यकतेनुसार जल जीवनमधून प्रस्ताव दिला असून, दोन वर्षांत या योजना पूर्ण होतील."

- एस. ए. बारटक्के, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, करवीर.

loading image
go to top