esakal | गडहिंग्लज बाजारातून 300 किलो प्लास्टिक जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

300 KG Of Plastic Seized From Gadhinglaj Market Kolhapur Marathi News

गडहिंग्लज शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे.

गडहिंग्लज बाजारातून 300 किलो प्लास्टिक जप्त 

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसापासून पालिकेचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती महेश कोरी यांनी स्वत: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकासमवेत शहरात फेरफटका मारून प्लास्टिक विरोधी मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला. आज (रविवार) आठवडा बाजारातील विक्रेत्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त केल्याचे सांगण्यात आले. 

प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होण्यात अडचणी अधिक असून गटारी आणि कचऱ्यामधून जाणाऱ्या प्लास्टिकने नागरिक हैराण झाले होते. पालिकेने याची दखल घेऊन पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी (ता. 19) कोरी यांनी कर्मचाऱ्यांच्या पथकासह बाजारपेठेत फिरून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले. विशेषत: किरकोळ विक्रेते, फिरते फळ, भाजीपाला, कापड विक्रेत्यांना सूचना दिल्या. 

आज आठवडा बाजार असल्याने सकाळपासूनच कोरी यांच्यासह आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, अभिजित जळके, मुकादम सुधीर कांबळे आणि सफाई कामगारांच्या पथकाने बाजारात फेरी मारली. ज्या विक्रेत्यांकडे प्लास्टिक दिसेल ते सर्व जप्तीची कारवाई केली. बाजारासाठी बाहेरूनही विक्रेते येतात. त्यांचीही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. 

अन्यथा व्यवसायाला मनाई 
दरम्यान, यापुढेही ही मोहीम कायम राहणार आहे. यामुळे विक्रेत्यांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा. अन्यथा शहरात व्यवसायाला मनाई करण्याचा इशारा फिरत्या विक्रेत्यांना कोरी यांनी दिला. दुसऱ्यांदा पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी व्यापारी व विक्रेत्यांनी पालिकेला सहकार्य करून प्लास्टिकमुक्त गडहिंग्लजसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही कोरी यांनी केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur