esakal | 40 हजार टन काजू फळ कुजण्याच्या मार्गावर 
sakal

बोलून बातमी शोधा

40 हजार टन काजू फळ कुजण्याच्या मार्गावर 

तालुक्‍याच्या डोंगराळ भागात वाहतुकीची सोय नसल्याने दरवर्षी सुमारे 16 हजार टन काजू फळ (मुरटे) कुजून वाया जाते. यंदा वाहतूक बंद असल्याने रस्त्याकडेच्या बागायतदारांची त्यात भर पडली आहे. सुमारे 40 हजार टन फळ शेतातच कुजण्याच्या मार्गावर आहे. हक्काचे चलन मिळवून देणारे हे फळ कुजताना पाहून शेतकरी हवालदिल होत आहेत. 

40 हजार टन काजू फळ कुजण्याच्या मार्गावर 

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

Kolhapur चंदगड तालुक्‍याच्या डोंगराळ भागात वाहतुकीची सोय नसल्याने दरवर्षी सुमारे 16 हजार टन काजू फळ (मुरटे) कुजून वाया जाते. यंदा वाहतूक बंद असल्याने रस्त्याकडेच्या बागायतदारांची त्यात भर पडली आहे. सुमारे 40 हजार टन फळ शेतातच कुजण्याच्या मार्गावर आहे. हक्काचे चलन मिळवून देणारे हे फळ कुजताना पाहून शेतकरी हवालदिल होत आहेत. 

तालुक्‍यात ऊस, भाजीपाला पिकांबरोबरच काजू हे नगदी पीक आहे. कमी कष्टात चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी माळरानावर, बांधावर त्याची लागवड केली आहे. तालुक्‍यात सुमारे 11 हजार हेक्‍टरवर हे पीक घेतले जाते. त्यातून सुमारे 8 हजार टन बी आणि 40 हजार टन फळ तयार होते. बी दीर्घ काळ टिकाऊ असल्याने तिची साठवणूक करता येते, परंतु फळ दोन दिवसांत कुजण्यास सुरवात होते. या फळाला गोव्यात फेणीसाठी मोठी मागणी आहे. 

दरवर्षी तेथील व्यापारी टेंपोतून येथील काजू फळ खरेदी करीत असत. डब्याला 15 ते 20 रुपये दर दिला जायचा. ही वाहने रस्त्याची सोय असलेल्या भागातूनच फळ गोळा करीत असत. त्यामुळे डोंगराळ भागातील फळ वाया जायचे. त्याचे प्रमाण सुमारे सोळा हजार टन आहे. यावर्षी वाहतूक बंद असल्याने रस्त्याकडेच्या बागायतदारांची त्यात भर पडली आहे. मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या पिकाचा हंगाम असला तरी एप्रिलअखेर गोव्यातील व्यापारी फळ खरेदी करतात. त्यामुळे यावर्षी हे फळ वाया जाणार आहे. शेजारच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी तालुक्‍यांचीही स्थिती अशीच आहे. तेथील उत्पादनाचा विचार करता कोट्यवधी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. शेतात फळ कुजताना शेतकरी अस्वस्थ होत आहे. 

""दरवर्षी फळ (मुरटे) विकून सुमारे दहा हजार रुपये मिळायचे. या वर्षी वाहतूक बंद असल्याने फळ जाग्यावर कुजत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोकण सीमेवरील तालुक्‍यात काजू फेणीसाठी परवानगी द्यायला हवी.'' 
- जयवंत पेडणेकर, काजू उत्पादक, नांदवडे.