esakal | Shivaji University Convocation Ceremony: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे काय म्हणाले पाहा व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

57th Convocation Ceremony of Shivaji University education marathi news

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पार पडला.

Shivaji University Convocation Ceremony: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे काय म्हणाले पाहा व्हिडिओ
sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : नवे शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होणार आहेत. यामध्ये शिक्षणाचा विचार हा बाल्यावस्थेपासून केला आहे. विविध क्षेत्रातील जागतिक संधींना गवसणी घालणारी, उच्चप्रतिची कौशल्ये आत्मसात केलेली आणि राष्ट्रवादी दृष्टीकोन बाळगणारी पिढी घडवणे हा या नव्या शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे. ही पिढी जागतिक स्तरावर या नव्या भारतीय शिक्षण पद्धतीचे प्रतिनिधित्व करेल. असा विश्‍वास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या 57 व्या दीक्षांत समारंभाचे ते प्रमूख पाहुणे होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मागर्दशन केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पार पडला. सुरुवातीला परीक्षा विभागाचे संचालक जी.आर.पळसे यांनी मिरवणुकीने ज्ञानदंड सभागृहामध्ये आणला. कोव्हीड काळात विद्यापीठाने केलेले कार्य, नॅक समितीचे मुल्यांकन आणि वर्षाभरातील विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी घेतला. यावेळी प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले,"भारताची अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटीची होत असताना हे नवे शैक्षणित धोरण योग्यवेळी आणण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या बाल्यावस्थेतील अध्यापनाचाही विचार केला आहे. खेळ, निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, कथाकथन या माध्यमातून लहान मुलांना मातृभाषेतून शिकवले जाईल. लहानपणापासून त्यांच्यामध्ये विविध प्रकारची कौशल्ये विकसीत करण्यावर या धोरणात भर दिला आहे. या धोरणामुळे उच्चप्रतिचे कौशल्य असणारी आणि राष्ट्रवादी दृष्टीकोन बाळगणारी पिढी तयार होईल. ही पिढी जागतिक संधींना गवसणी घालेल. 

तरुणाईच्या इच्छा आकांक्षा या नव्या शैक्षणिक धोरणात दिसत आहेत. या धोरणामुळे नवी भारतीय शिक्षणपद्धती विकसीत होणार आहे. यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.' स्नातकांना शुभेच्छा देताना सहस्त्रबुद्धे म्हणाले, "तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी हा अभिनामानाचा क्षण आहे. जे पदवीधर झाले आहेत ते एका महत्वकांक्षेने उच्च शिक्षणाला सुरुवात करतील. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, जीवनातील प्रत्येक संकटाला आत्मविश्‍वासेने सामोरे जाणे हे खरे शिक्षण आहे. जोपर्यंत या गोष्टी साध्य होत नाहीत तोपर्यंत शिक्षणाचा प्रवास सुरूच राहीस. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा समाजातील वंचीत घटकांना उपयोग होणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.' उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. 

यावेळी प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, आधिष्ठाता डॉ.आर.के.कामत, डॉ.पी.आर.शेवाळे, डॉ.मेघा गुळवणी, डॉ.एस.एस.महाजन, वित्त व लेखापाल डॉ.व्ही.टी.पाटील, उपकुलसचिव व्ही.एन.शिंदे हे उपस्थित होते. 

ही पहिली पदवी ठरावी 
राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी म्हणाले, जे आज पदवीधर झाले आहेत त्यांच्यासाठी ही अंतिम नव्हे तर पहिली पदवी असावी. त्यांनी अजून शिक्षण घेउन अधिक ज्ञान घ्यावे. शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहीजे. शिक्षणाने मनातील संकुचीतता दूर होऊन प्रांत, भाषा या वादापासून दूर होऊन आपण अधिक उंची गाठली पाहीजे. महापुरषांचे विचार प्रत्यक्ष आमलात आणले पाहीजे. निसर्ग, पर्यावरण, माणूस यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहीजेत. 

संपादन- अर्चना बनगे