esakal | घेतली लस, आता बिनधास्त बंदोबस्त!

बोलून बातमी शोधा

null

घेतली लस, आता बिनधास्त बंदोबस्त!

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : ते फ्रन्ट वॉरिअर रोज रस्त्यावर बंदोबस्तासाठी. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाची भीती अधिक होती; मात्र शासनाच्या नियमानुसार त्यांनी पहिली आणि दुसरी लस घेतल्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका तूर्त तरी टळला आहे. सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण पोलिस दलात तरी घटले आहे. घेतली लस, आता बिनधास्त बंदोबस्त असे खुद्द पोलिसांकडूनच सांगितले जाते.

कोरोना संकटकाळात कोरोना योद्धा म्हणून पोलिस आघाडीवर कर्तव्य बजावत आहेत. गतवर्षीच्या लॉकडाउनपासून पोलिस यंत्रणा मास्कविना आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालत आहे. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असणारी रुग्णालये, अलगीकरण कक्ष येथेही अव्याहतपणे बंदोबस्त बजावत आहे. अशा काळात पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले होते. जिल्हा पोलिस दलात तब्बल 380 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची बाधा झाली होती. यात दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता.

हेही वाचा: गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

दरम्यान, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. पुढे कोरोना प्रतिबंधक लस मिळाली. आघाडीवरील कोरोना योद्धा म्हणून पोलिसांना ही लस देण्यात आली. जिल्हा पोलिस दलात सुरवातीला लस घेण्यास पसंती मिळत नव्हती. मार्चच्या सुरवातीला लसीकरणाचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांवर अडून बसले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ही लस स्वतः मी घेतली असून, ती किती उपयुक्त आहे याबाबत प्रबोधन केले. एप्रिलअखेर जिल्हा पोलिस दलातील 90 टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले. आता त्यांच्या नातेवाईकांच्या लसीकरणाला वेग आला आहे.

दृष्टिक्षेपात...

  • जिल्ह्यातील पोलिस अधिकारी : 159

  • जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी : 2760

  • गतवर्षी कोरोनाबाधित पोलिस : 380

  • पहिली लस घेतलेले पोलिस : 2415

  • दुसरी लस घेतलेले पोलिस : 1580

  • सध्या बाधित पोलिस : 14 (सर्वांची प्रकृती स्थिर)

हेही वाचा: 4 दिवसात 137 कोटींचा निधी बांधकाम मजुरांच्या खात्यावर जमा

"जिल्हा पोलिस दलाचे 90 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीही कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे याबाबतच्या सूचना दिल्या आहेत."

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक