esakal | विहिरीत आढळलेल्या तरुणाचा खूनच; इचलकरंजी येथील घटना

बोलून बातमी शोधा

null

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

विहिरीत आढळलेल्या तरुणाचा खूनच; इचलकरंजी येथील घटना
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील आमराई रोडवरील तांबे मळ्यात विहिरीत आढळलेल्या मृताची ओळख पटली असून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. किशोर महालिंग भोसले (वय 35, सध्या आसरानगर) असे त्याचे नाव आहे. लाकडी जड वस्तूने डोक्‍यात जबर प्रहार करून त्याला शनिवारी (ता. 1) दुपारच्या सुमारास तांबे मळ्यातील विहिरीत टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. प्राप्त माहितीनुसार गावभाग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (A youth found in a well at Ichalkaranji has been found murdered)

सोमवारी (ता. 3) सायंकाळी आमराई रोडवरील तांबे मळ्यातील विहिरीत युवकाचा मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला. पोलिसांनी व्हाईट आर्मीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृताच्या डोक्‍यावर व पाठीवर जबरी घाव असल्याने खून झाल्याचा संशय होता. शिवाय मृताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अवघ्या बारा तासांत मृताची ओळख पटविण्यात गावभाग पोलिसांना यश आले. मृताच्या मावस बहिणीने मृतदेह किशोर भोसले याचा असल्याचे सांगितले.

हेही वाचा: इचलकरंजी बाजारात अनेकांचे मास्क हनुवटीवरच

सांगली नाका रोडवरील आसरानगर भागात किशोर भोसले पत्र्याच्या शेडवजा भाड्याच्या खोलीत राहत होता. तीन वर्षांपासून बांधकामाच्या ठिकाणी मिळेल ते काम करत तो एकटाच राहत होता. आसरानगर भागाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तांबे माळ भागात तो नियमित जात असे. घटनास्थळी विहिरीच्या शेजारीच पोलिसांना ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले आहेत. लाकडी जड वस्तूने डोक्‍यात मारहाण करून भोसले याला विहिरीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मित्रांच्या भांडणासह आर्थिक देवघेवीतून खून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत किशोर मूळचा सोलापूरचा

मृत किशोर भोसले मूळचा सोलापूर येथील आहे. तीन वर्षांपासून शहरातील आसरानगर भागात तो स्वत:चे नाव बदलून आकाश भोसले या नावाने राहत होता. पंढरपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद आहे. त्यामुळे तो पसार होऊन शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

(A youth found in a well at Ichalkaranji has been found murdered)