esakal | हत्तरगी-हिडकल डॅम मार्गावर दुचाकीच्या धडकेत गडहिंग्लजमधील दोघे ठार

बोलून बातमी शोधा

null
हत्तरगी-हिडकल डॅम मार्गावर दुचाकीच्या धडकेत गडहिंग्लजमधील दोघे ठार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (कोल्हापूर) : हत्तरगी- हिडकल डॅम मार्गावर दुचाकीने रोडरोलरला धडक दिली. त्यात गडहिंग्लज तालुक्यातील नंदनवाड येथील दोघे जण ठार झाले. मंगळवारी (ता. २०) रात्री ही घटना घडली. अशोक मल्लाप्पा करगण्णावर (वय 39) व बसवराज भीमा कलगौडा (वय 29, दोघेही रा. नंदनवाड, ता. गडहिंग्लज) अशी मयतांची नावे आहेत. यमकनमर्डी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,

अशोक करगण्णावर व बसवराज कलगौडा हे दोघेही मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा आपल्या दुचाकीने (एमएच 09 टीपी 0650) हिडकल डॅमकडून हत्तरगीकडे येत होते. त्यांच्या दुचाकीने वाटेत थांबलेल्या रोडरोलरला धडक मारली. त्यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगावला घेऊन जाताना वाटेतच दोघांचे निधन झाले.

घटनास्थळी यमकनमर्डी पोलिसांनी निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. रात्रीची वेळ असल्याने अपघात कसा झाला याबाबत नेमकी माहिती घेण्यात येत आहे. यमकनमर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. यमकनमर्डी पोलिस पुढील तपास करीत आहेत. बुधवारी (ता. २१) या अपघाताबाबतची माहिती हत्तरगी परिसरात पसरल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

Edited By- Archana Banage