esakal | स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

sakal_logo
By
मतीन शेख

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याच्या स्वप्नांचा पाठलाग लाखो तरुण-तरुणी करतात; पण प्रत्येकाच्या पदरात यश पडेल, याची शाश्वती नसते. स्पर्धेच्या युगात अनेक तरुणांना अपयशानं गाठलं. जागा निघत नाही, परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा पास झाले, तर नेमणुका होत नाहीत, अशा विविध कारणांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाईला नैराश्याने गाठले आहे; पण यातून बाहेर पडत, स्पर्धा परीक्षेला वेळीच राम राम ठोकत वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होत इतरांना प्रेरणा मिळावी, अशी वाटचाल काही तरुण करत आहेत. या तरुणांच्या कणखर यशाचा वेध घेणारी ही मालिका आजपासून....

कोल्हापूर : लहानपणापासूनच तो शाळेत हुशार, कलेक्टर (collector) होण्याचं त्याचं स्वप्न, त्या दिशेने त्याची वाटचाल ही सुरू होती.पदवीनंतर त्याने पुणे गाठले. तिथे ४ वर्षे अभ्यास केला. ‘यूपीएससी’ (UPSC) मुख्य परीक्षेपर्यंत पोहचला, अपयश पदरी आलं, राज्य सेवेची (MPSC) चार वेळा मुख्य परीक्षा दिली; पण त्यात ही अपयशच. शेवटी त्याने निर्णय घेतला, स्पर्धा परीक्षा सोडत गाव गाठलं. गावात राईस मिल (rice meal) सुरू करत तो उद्योजक झाला. ही यशोगाथा आहे, सांगरूळ (sangrul) (करवीर) येथील शेखर भगवंत लोंढे याची.

हेही वाचा: व्हेल माशाच्या उलटीला इतके का महत्व? उलटी कशी ओळखतात

शेखरने २०१२ ला शिवाजी विद्यापीठातून (shivaji university) एमबीए पूर्ण केले. पुण्यात ‘यूपीएससी’चा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षेपर्यंत त्याने मजल मारली. एमपीएससीतून राज्यसेवेची परीक्षा ही दिली. चार वर्षे विविध परीक्षा दिल्या; पण यश एक-दोन मार्कांनी हुलकावणी देत होतं. घरच्यांकडून खर्चासाठी पैसे घेण्याची त्याला लाज वाटू लागली. वडील निवृत्त मुख्याध्यापक असल्याने पैसे पाठवत बळ देत होतेच. शेवटी कोल्हापूरला परतत त्याने विद्यापीठात अभ्यास सुरू केला. यश मिळत नव्हतं. कोरोना आल्यावर त्याने कायमचं गाव जवळ केलं. अधिकारी बनण्याच्या शक्यता धुसर झाल्या आणि शेखरने स्पर्धा परीक्षा सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे काय करायचे? हा प्रश्न होताच.

गावाकडे बंद असलेली घरची राईस मिल सुरू करण्याची त्याने योजना आखली. मिलचा विस्तार करत आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला. घरच्याकडून पाठिंबा मिळाला. भांडवल उभे करणे, यंत्रसामुग्री, कामगार उपलब्ध करणे, असे प्रश्न होतेच. कोरोनाचे संकट होतेच; पण तो खंबीर राहिला. अत्याधुनिक संगणकीकृत मशिनरी त्याने मिलमध्ये आणल्या. कर्नाटकातून भात घेत सांगरूळच्या मिलमध्ये आणले.

हेही वाचा: पुढील निर्णयापर्यंत दुपारी चारनंतर दुकाने बंदच ; डॉ.बलकवडे

भाताचे ग्रेडिंग करणे, पॉलिश, फिनिशिंगची प्रक्रिया तो मिलमध्ये करून घेतो. सध्या महिन्याला जवळपास ८०० टन भातावर प्रक्रिया करत आहे. ‘मदर गोल्ड’ नावाने त्याने भाताचा ब्रॅण्ड मार्केट तयार केला आहे. मुंबई, वाशी, पनवेल शहरांत तो भात पाठवतो. त्यातून महिन्याला जवळपास १ कोटीची उलाढाल तो करतो. अपयशी पायऱ्यांची चढउतार केल्यानंतर शेखरने यशाची मुहूर्तमेढ रोवली. अधिकारी होण्याचं स्वप्न साकार झालं नसलं, तरी व्यवसायात यशस्वी होत आई-वडिलांना आनंद देता आला. यातच सर्व आलं, अशी शेखरची भावना व प्रयत्न तरुणांना प्रेरणा देणारे आहेत. (क्रमशः)

"यश-अपयश जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी एक टाईम लिमिट ठरवायला हवे. वेळेत जर यश मिळाले नाही, तर यशस्वी माघार घेत तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगाकडे वळावे. नैराश्याला झटकून नवे अवकाश जवळ करावे."

- शेखर लोंढे, भात मिल व्यावसायिक

loading image