esakal | आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप
sakal

बोलून बातमी शोधा

agents work in RTO office observe by transportation commissioner in kolhapur

परिवहन आयुक्तांनीच घेतली दखल;  आदेशाला केराची टोपली दाखविल्यास वरिष्ठांवर कारवाई

आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)तील एजंटगिरी बंद करण्यासाठी थेट परिवहन आयुक्तांनीच आदेश काढले आहेत. कायम चर्चेत असलेल्या कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट बंद करण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक परिवहन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर राहणार आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

एजंटगिरीला चाप आणि कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी थेट परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनीच पुढाकार घेतला आहे. कोणत्या पळवाटा शोधून एजंटगिरी होऊ शकते यावर त्यांनी बोट ठेवले असून थेट आदेश काढून वरिष्ठांवर कारवाई करणार असल्याचा समजवजा आदेश दिले आहेत. आदेशात काही मुद्देही नमूद आहेत. त्यानुसार आरटीओतील एजंटगिरी संपेल आणि त्याला खतपाणी घालणाऱ्यांना चाप बसेल असे काही नियमही तयार केले आहेत.

अनेक वेळा आरटीओतील भ्रष्टाचाराला, गैरव्यवहाराला अंतर्गत कोणाकडून तरी खतपाणी घातल्याशिवाय तो फोफावत नाही याचाच विचार करून त्यांनी नियम तयार केल्याचे दिसून येते. याबाबतचे आदेश त्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनीसुद्धा अशा पद्धतीने एजंटगिरी बंद करण्याबाबतचे आदेश काढले होते. दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी याबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्क करण्याची आणि आयुक्तांचे आदेश पाळण्याच्या सूचना देणारी नोटीस आज काढली आहे.

असे आहेत आदेश

- कक्ष-विभागात इतरांना प्रवेश बंद
- प्रवेश निषिद्ध असा फलक आवश्‍यक
- नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष
- मदत कक्षात जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक
- जनसंपर्क अधिकारी नसल्यास चक्राकार पद्धतीने नियुक्ती
- कर्मचाऱ्यांना दिलेले ‘लॉगिन आयडी’ व ‘पासवर्ड’ इतर         कोणाला देऊ नये
- पासवर्ड इतरांना दिल्याचे आढळल्यास कर्मचाऱ्यावर       कारवाई
- महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top