कृषी विधेयकाच्या विरोधात गडहिंग्लजला रास्ता रोको

Agitation Against The Agriculture Bill In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Agitation Against The Agriculture Bill In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात गडहिंग्लज शहर व तालुका कॉंग्रेसतर्फे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आणि संकेश्‍वर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कामगारविरोधी काळे कायदे तत्काळ मागे घ्यावेत, अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. 

महात्मा गांधी जयंतीचा दिवस कॉंग्रेसने आज शेतकरी-कामगार बचाओ दिन म्हणून जाहीर करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर अचानक कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज-संकेश्‍वर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला. परिणामी, अर्ध्या तासाहून अधिक काळ दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने वाहने थांबली. 

सकाळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला. ऍड. दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविकात आंदोलनाचा हेतू स्पष्ट केला. जनता दलाचे नेते माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रा. किसनराव कुराडे, बसवराज आजरी, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे, अजिंक्‍य चव्हाण, राजशेखर यरटे, सोमगोंडा आरबोळे, अमर गोडसे यांची भाषणे झाली. 

प्रा. कुराडे म्हणाले, ""शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार केले पाहिजे. ज्या शेतीवर देश उभा राहिला आहे ती शेतीच खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र हाणून पाडावे.'' 

ऍड. शिंदे म्हणाले, ""शेती कोलमडून पडली पाहिजे, या हेतूनेच भाजप सरकारचा शेती उद्योग कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव आहे. नव्या विधेयकाने शेतकऱ्यांची व्यवस्था उद्‌ध्वस्त होणार आहे. सर्वांनी पक्षभेद विसरून या विरोधात लढा उभा करण्याची गरज ओळखून कॉंग्रेसच्या आंदोलनाला जनता दल पाठिंबा देत आहे.'' 
जोतिराम केसरकर यांनी आभार मानले. स्वप्नील चराटी, प्रदीप पाटील, दयानंद पट्टणकुडी, मारुती कांबळे, रावसाहेब पाटील, संतोष चौगुले, अरुण कुलकर्णी, सचिन मुळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

राहुल गांधींना धक्काबुक्कीचा निषेध 
उत्तर प्रदेशमध्ये अत्याचार झालेल्या पीडित मुलीच्या गावाकडे जाताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची कॉलर पकडून पोलिसांनी धक्काबुक्की केली. देशाच्या विकासात चार पिढ्यांचे ज्या घराण्याचे योगदान मिळाले, त्या गांधी घराण्यातील राहुल यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेचा कॉंग्रेसने तीव्र निषेध नोंदवला. मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com