esakal | गडहिंग्लजसह खेड्यांच्या वेशी झाल्या बंद
sakal

बोलून बातमी शोधा

All Gates Close In Gadhinglaj Taluka Villages Kolhapur Marathi News

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून पाठोपाठ कडक पावले उचलली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरासह तालुक्‍यातील बहुतांशी गावांच्या वेशी बंद केल्या आहेत. बाहेरच्या नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात येत असून आवश्‍यक असेल तरच गावात प्रवेश दिला जात आहे.

गडहिंग्लजसह खेड्यांच्या वेशी झाल्या बंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून पाठोपाठ कडक पावले उचलली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरासह तालुक्‍यातील बहुतांशी गावांच्या वेशी बंद केल्या आहेत. बाहेरच्या नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात येत असून आवश्‍यक असेल तरच गावात प्रवेश दिला जात आहे. विशेषत: मोटारींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सकाळपासून भाजी आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांनी ठिकठिकाणच्या दुकानांच्या बाहेर गर्दी केली होती. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाने एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार रविवारी दिवस-रात्र त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राज्य शासनाने आजपासून राज्यातील शहरी भागात जमावबंदी आदेश लागू केला. आज पहाटे हा कर्फ्यू शिथिल होताच नागरिक रस्त्यावर येवू लागले.

अत्यावश्‍यकच्या यादीत किराणा मालाची दुकाने, भाजीपाला असल्याने या खरेदीसाठी नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी गर्दी करू लागले. किराणा दुकान मालकाना सूचना देवून एकावेळी दोन ग्राहकांनाच आत घेवून माल देण्यास पोलिसांनी सांगितले. कोणत्याही परिस्थिती गर्दी करायची नाही अशा सक्त सूचना देण्यात आल्याने शटर बंद करून एकावेळी दोघांनाच आत घेतले जात होते. यामुळे दुकानाबाहेर रांग लागली होती. काही अत्यावश्‍यक नसलेली दुकानेही सुरू असल्याचे आढळताच पोलिसांनी संबधित दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी काहींना पोलिसांकडून 'प्रसाद'ही मिळाला. भाजी खरेदीसाठीही नागरिकांनी सायंकाळी गर्दी केली होती. 

शहरात ठिकठिकाणी गर्दी होत असल्याने सायंकाळी पोलिसांनी शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. गल्लीबोळसुद्धा बॅरेकेटींग लावून वाहनांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला. अत्यावश्‍यक काम असलेल्यांनाच शहरात प्रवेश दिला जात होता. चारचाकी मोटारींनाही सोडले जात नव्हते. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर समिती नियुक्त करून या समितीद्वारे गावच्या वेशी बंद करण्याची सूचना केली होती. यामुळे आज सकाळपासूनच गावागावात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. सायंकाळपर्यंत बहुतांश गावात त्याची अंमलबजावणी झाली होती. गावाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाके उभारून गावात येणाऱ्यांची चौकशी केली जात होती.

पुणे-मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना तपासणी करूनच गावात प्रवेश दिला जात होता. आवश्‍यक असेल तरच गावात प्रवेश देण्यात येत असून अनोळखी नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा पाठपुरावा सुरू केला आहे. 

इंचनाळकरांनी लावले दगड 
बहुतांश जणांनी बांबू, लोखंडी बॅरेकेटींग वापरून आपल्या गावची वेस ओलांडण्यास परवानगी नाकारली आहे. परंतु, इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील युवकांनी मोठमोठे दगड लावूनच रस्ता अडविला आहे. हे दगड इतके मोठे आहेत की ते जेसीबीद्वारे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

loading image