esakal | मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप निव्‍वळ वैफल्यातून
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप निव्‍वळ वैफल्यातून

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप निव्‍वळ वैफल्यातून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : माजी महापौर सुनील कदम व सत्यजित कदम यांनी आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व एका मंत्र्यांवर केलेले आरोप हे निव्वळ वैफल्यापोटी व राजकीय द्वेषापोटी आहेत, असे प्रत्युत्तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर माजी महापौर आर. के. पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, आदिल फरास, विनायक फाळके यांच्या सह्या आहेत. बिनबुडाचे आरोप करण्याची प्रथा चालू ठेवायची असल्यास आम्हालाही त्यांच्यावर व त्यांच्या नेतेमंडळींवर आरोप करणे अवघड नाही, याचे भान कदम बंधूंनी ठेवावे, असा इशारा पत्रकात दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे, ई वॉर्डमधील रि.स. नं. ८७४ रमणमळा तलाव हा पर्यटन विकास केंद्रासाठी आरक्षित आहे. त्याचे क्षेत्र १ हेक्टर ८५ आर. इतके आहे. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क चालवण्यास घेतलेली कंपनी व आमच्या संगनमताने त्या क्षेत्रामध्ये काही बदल केला आहे, असा जो कदम बंधूंचा आरोप आहे तो खोटा व बालिश बुद्धीचा आहे. ही जमीन यूएलसी ॲक्ट १९७६ कलम ८ (४) या निवाडा आदेशान्वये अतिरिक्त क्षेत्र ८६२.०५ चौ.मी. घोषित झालेले आहे. त्या संबंधीचे सर्व शासकीय आदेश झालेले आहेत. यावर मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांना प्रदान असलेल्या यूएलसी ॲक्ट १९७६ मधील कलम ३४ अन्वये पुनर्विलोकन आदेशानुसार २००५ मध्ये तळेगाव दाभाडे योजना टीड ५७२ अन्वये मंजूर झालेली आहे.

मूळ जमीन मालक श्री. घोरपडे बंधूंनी अतिरिक्त जमिनीवर सूट मिळण्याबाबतचा प्रस्ताव रीतसर शासन दरबारी दाखल केला. त्यास ७ नोव्हेंबर २००६ ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. अंतिम रेखांकन मंजुरी, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेऊन इमारत पूर्ण आहे. इमारतीमधील बांधलेल्या सदनिका किती विक्री कराव्यात व किती स्वत:कडे ठेवाव्यात, हा सर्वस्वी अधिकार जागा मालक यांचा आहे. त्यामुळे याबाबतीतील साजिद मुश्रीफ व शेजारची कंपनी, तसेच हसन मुश्रीफ व मंत्र्यांवरील सर्व आरोप अत्यंत खोटे, बिनबुडाचे आहेत. या संबंधीची कागदपत्रे, नकाशे, शासकीय आदेश जर कदम बंधूंना अभ्यासाकरिता पाहिजे असतील, तर ते सांगतील त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

loading image
go to top