
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी अखेर पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांची निवड झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज या समितीची यादी जाहीर केली. समितीमधील सदस्य पदांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. चव्हाण हे तालुक्यातील चन्नेकुप्पीचे असून गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर या समितीची फेररचना केली जाते. यावेळी मात्र समितीच्या फेररचनेसाठी तब्बल वर्षभराने मुहूर्त मिळाला. ज्यावेळी समिती रचनेची चर्चा सुरू झाली, तेंव्हा अध्यक्षपदासाठी कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांमध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. कागल मतदारसंघातून गडहिंग्लजचे नगरसेवक हारूण सय्यद तर "चंदगड'मधून चव्हाण इच्छुक होते. मुळातच वर्षभर लांबलेल्या या निवडीसाठी रस्सीखेचामुळे पुन्हा प्रतिक्षा करावी लागली. दोघाही इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली होती. अखेर या पदावर चव्हाण यांनी बाजी मारली. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. परंतु, पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा महिनाभर निवड यादी जाहीर करण्याची प्रक्रिया लांबली होती.
आज जिल्हाधिकारी देसाई यांनी नूतन समितीची यादी जाहीर केली. समितीमध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, जनता दल आदी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. अकरा जणांच्या या समितीत सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, मागासवर्गीय, महिला, सर्वसाधारण, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी एक, इतर मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी दोन, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी अशासकीय प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी एकाची निवड करण्यात आली. याशिवाय सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून तहसीलदार पदसिद्ध आहेत.
समितीचे सदस्य असे...
समितीच्या नूतन सदस्यांमध्ये मोहन कांबळे (वाघराळी), ज्योत्स्ना पताडे (महागाव), रमजान अत्तार (गडहिंग्लज), बाळेश नाईक (बसर्गे), सचिन देसाई (हिरलगे), रोहिणी भंडारे (शेंद्री), हारूण सय्यद (गडहिंग्लज), प्रशांत देसाई (दुंडगे), रघुनाथ पाटील (हनिमनाळ) यांचा समावेश आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.