esakal | वास्तुसौंदर्याचा अप्रतिम आविष्कार - 'अंबाबाई मंदिर' I Navratri
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील अपरिचित वैभव

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील अपरिचित वैभव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवास (गुरुवार) पासून प्रारंभ झाला आहे. वास्तुसौंदर्याचा अप्रतिम आविष्कार असणाऱ्या या मंदिरातील काही गोष्टी अद्यापही अनेकांसाठी अपरिचित अशा आहेत. नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त नऊ प्रातिनिधिक गोष्टींविषयी...

शास्त्रीय संगीताची सेवा

राजर्षी शाहूंच्या आमंत्रणावरून सव्वाशे वर्षांपूर्वी, १८९५ ला उत्तर हिंदुस्थानातून उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेब करवीर संस्थानात आले. त्यांचेच शिष्य उस्ताद भुर्जी खाँसाहेबांनी मंदिरातील गरुड मंडपात गायनसेवेचा प्रारंभ केला. त्यांचे नातू अजिजुद्दीन खाँसाहेबांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात आजही शास्त्रीय गायनाची परंपरा जपली जाते.

प्रभावळीमागील पऱ्या

मंदिरात अनेक कलांचा आविष्कार पाहावयास मिळतो. चार चांदी कारागीर व दोन डिझायनरनी देवीच्या मागील चांदीची प्रभावळ बनविली. ही प्रभावळ स्वच्छतेसाठी नवरात्रोत्सवापूर्वी काढली, की वर्षभर प्रभावळीच्या मागे झाकून राहणाऱ्या पऱ्यांची रेखाचित्रे ठळकपणे जाणवतात. दोन्ही बाजूंनी पुष्पहार घेऊन हवेतून झेपावत येत असलेल्या या पऱ्यांची रेखाचित्रे कृ. दा. राऊत यांनी रेखाटली आहेत.

हेही वाचा: Air Force Day: PM मोदींनी दिल्या सदिच्छा; वाचा IAFबद्दलच्या खास गोष्टी

प्राचीन व प्रेक्षणीय मंदिर

मंदिर सर्वांत प्राचीन व प्रेक्षणीय असून सखल भागात आहे. स्थापत्य, शिल्पकला आणि सौंदर्याचा सुरेख मिलाफ येथे पाहावयास मिळतो. मंदिराचा गाभारा शके ५५० ते ६६० च्या काळातील चालुक्‍यांतील करणदेव राजांनी बांधला. पुढे शिलाहार राजवटीत नवव्या शतकात त्याचा विस्तार झाला. त्यानंतर अठराव्या शतकात छत्रपतींनी त्यावरील शिखरे बांधली. मंदिर दोन मजली असून त्याची रचना बिल्वयंत्रावर केलेली आहे.

मंदिरातील जलवैभव

मंदिराच्या प्रसन्नतेत भर घालणारे जिवंत झरे असणारे काशिविश्वेश्वर व मनकर्णिका कुंड होते. ही कुंडे पाण्याने बारमाही भरलेली असत. मंदिराच्या पश्चिमेला खाली कपिलतीर्थही होते. पण, कालौघात मंदिरात गर्दी वाढू लागली आणि जागा कमी पडू लागल्याने ही तीर्थकुंडे बुजवली गेली. मनकर्णिका कुंडाचे सौंदर्य देवस्थान समितीच्या माध्यमातून पुन्हा खुले झाले आहे.

हेही वाचा: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचा भडका; पाचवेळा दरात वाढ

मंदिर अन् राज्यकारभार

शिलाहार राजा दुसरा भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूर केली. त्यानंतर यादव, बहामनी, महंमद गवान यांच्याकडे असलेला हा परिसर मराठ्यांच्या राज्यात आला. दरम्यान, मोगलांच्या काळात देवीची मूर्ती सुरक्षित राहावी, यासाठी कपिलतीर्थ येथे पुजाऱ्याच्या घरी ठेवली होती. थोडक्यात, येथील प्रत्येक राजवटीमध्ये हे मंदिर केंद्रस्थानी राहिले. पुढे याच परिसरात करवीरच्या छत्रपतींनी राजवाडा, तुळजाभवानी मंदिर बांधले.

उपासनेसाठीची दालने

पुरुषदेवतांच्या मंदिरात उपासना, ध्यानासाठी तळघरात व्यवस्था असते; मात्र देवीच्या मंदिरात ही व्यवस्था दुसऱ्या मजल्यावर असते. अंबाबाई मंदिरात दुसऱ्या मजल्यावर उपासनेसाठी अशी दालने असून, सुरक्षिततेच्या कारणामुळे भिंत घालून ती बंद केली होती. मात्र, अलीकडच्या काळात देवस्थान समितीने ही भिंत काढली असून, उपासनेसाठीची ही दालनेही खुली झाली आहेत.

पालखीसमोर गायन

देवीची पालखी मंदिरात सात ठिकाणी थांबते. या प्रत्येक ठिकाणी गायनातून देवीची स्तुती करण्याचा मानाच्या नायकिणीचा मान बिरंजे कुटुंबाकडे आहे. त्याशिवाय रथोत्सवावेळी रात्री उशिरा रथ महाद्वारात आला, की देवीची दृष्ट काढून पायांवर पाणी घातल्यानंतरच देवी पुन्हा मंदिरात विराजमान होते. हा दृष्ट काढण्याचा मान कदम कुटुंबाकडे आहे.

हेही वाचा: तेजस्विनी पंडितने मागितली चाहत्यांची माफी

अनेक पिढ्यांची सेवा

देवीची सेवा करणारी अनेक घराणी आजही देवीच्या सेवेत आहेत. श्रीपूजकांची ५४ वी पिढी सध्या कार्यरत असून, देवीच्या दागिन्यांची जबाबदारी असणारे खांडेकर, तोफ व पालखीची सेवा देणारे जाधव यांची दहावी पिढी, तर चोपदार, वाजंत्री, रोशननाईक, नैवेद्याची सेवा देणाऱ्या घराण्यांतील दोन ते तीन पिढ्यांनी ही सेवा दिली आहे.

आदिलशाहीपासूनचे दागिने

देवीच्या खजिन्यात कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या सोने व चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. आदिलशाहीपासून शिवकाल ते अगदी पेशवेकालीन दागिनेही त्यामध्ये आहेत. हिऱ्यांची नथ, पाचूचा हार, किरीट, कुंडल, रत्नजडित मुकुट, पुतळ्यांची माळ, कवड्यांची माळ, सोळापदरी चंद्रहार, मोत्यांच्या माळा, सातपदरी कंठी, सोन्याचे म्हाळुंग, मंगळसूत्र, श्रीयंत्र, पादुका आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा: ब्लँक चेक देतो, फक्त भारताविरुद्ध जिंका; उद्योगपतीची पाकिस्तानला ऑफर

loading image
go to top