Amboli Ghat : आंबोली घाटाला हवे सुरक्षा कवच

पावसाची रिमझिम, धुक्याची झालर, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आल्हाददायी गारवा अनुभवणाऱ्यांसाठी निसर्ग सौंदर्याने नटलेला आंबोली घाट नेहमीच आकर्षण ठरला आहे; मात्र या घाटाच्या सुरक्षेसाठीच्या उपायांवर वर्षानुवर्षे केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत.
Amboli Ghat
Amboli Ghatsakal

सावंतवाडी : पावसाची रिमझिम, धुक्याची झालर, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आल्हाददायी गारवा अनुभवणाऱ्यांसाठी निसर्ग सौंदर्याने नटलेला आंबोली घाट नेहमीच आकर्षण ठरला आहे; मात्र या घाटाच्या सुरक्षेसाठीच्या उपायांवर वर्षानुवर्षे केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. आंबोली घाटात गेल्या पाच वर्षांत केवळ डागडुजीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. वर्षानुवर्षे दुरुस्तीवर कोटींची उड्डाणे करूनही काही काळानंतर घाट पुन्हा नादुरुस्त होतो. याचा फटका वाहनचालकांना बसतो. तब्बल सव्वाशे वर्षे जुन्या असलेल्या या घाटाच्या नूतनीकरणावर काम करण्याची आणि या दुखण्यातून दीर्घकालीन उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

घाटाची उभारणी

पूर्वी समुद्रमार्गे व्यापार चालायचा. शिवाय सत्ता राखण्याच्या दृष्टीनेही समुद्रावर वर्चस्व महत्त्वाचे असायचे. कारण शत्रू समुद्रमार्गे येण्याची शक्यता जास्त असायची. आंबोलीसह सर्वच सह्याद्रीच्या रांगांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली आहे. त्यामुळे प्रचंड उंच-सखल कडे, दऱ्या या रांगांमध्ये आहेत. वरचा भाग समुद्राला जोडण्यासाठी या रांगांमधून रस्ता काढणे अत्यावश्यक होते. त्यातूनच घाटमार्गांची निर्मिती झाली. आंबोलीचा हा घाट १८६८ मध्ये ब्रिटिशांनी बांधला होता. त्या काळात ब्रिटिशांचा लष्करी तळ बेळगावमध्ये होता. रेडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग ही बंदरे त्या काळात महत्त्वाची होती. डच लोकांच्या वास्तव्यामुळे वेंगुर्लेचे महत्त्व वाढले होते. त्यामुळे बेळगाव ते वेंगुर्ले मार्ग काढण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. युद्धसामग्री, सैन्य याची वाहतूक हा यामागचा मुख्य उद्देश होता. त्यापूर्वी पारपोलीमार्गे सावंतवाडीतून आंबोलीत जायचा मार्ग होता; मात्र तो पायवाट स्वरूपाचा होता. ब्रिटिशांना एका धनगराने आताच्या घाटाचा मार्ग दाखविला व तो उभारला गेला. त्या काळात रस्त्याच्या डागडुजीसाठी ठराविक रकमेची तरतूदही केली होती. करवसुलीसाठी आंबोलीतील जकातवाडीत नाका होता.

का ढासळतोय घाट?

मुळात घाटाची वेळच्यावेळी देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. शिवाय या घाटाची क्षमताही कमी आहे. तुलनेत अवजड वाहतूक वाढली आहे. घाटाच्या कड्यावरील झाडांची मुळे खोल गेल्याने दगडातील भेगा वाढत आहेत. वाहतुकीमुळे निर्माण झालेली कंपने आणि प्रदूषण यामुळे या भेगांमध्ये भर पडून दरडी सैल होत आहेत. त्यातच पावसाळ्यातील पाणी आत शिरून दगड व माती सुटते व दरडी कोसळतात. भूगर्भातील हालचालींचाही यावर परिणाम होतो.

Amboli Ghat
Kolhapur Airport : विमानांसह हेलिकॉप्टरची 195 'राजकीय उड्डाणे'; लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले

पर्यटनाचे महत्त्व

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली घाटमाथ्याकडे हा घाटरस्ता आपल्याला घेऊन जातो. महाराष्ट्रातील महत्त्वाचा असा हा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाटमार्ग आहे. या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पाहत घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो. पावसाळ्यात तसेच जोडून येणाऱ्या सुट्यांमध्ये येथे पर्यटकांचा ओघ सुरू असतो. दाट जंगले, दऱ्याखोऱ्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते. घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. आंबोलीतील पारपोली येथील धबधबा हा सर्वांत मोठा धबधबा आहे. नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी नदीचे उगमस्थानही आंबोलीतील पर्यटनस्थळ म्हणून पुढे आले आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या आंबोली घाटात सर्वांत जास्त धबधबे, घाटवळणाचे रस्ते यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा पर्यटकांचे व निसर्गप्रेमींचे आवडते पर्यटन ठिकाण बनलेले आहे. आंबोली येथील महादेव गड, कावळेसाद असे असंख्य पॉईंट आहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. आंबोलीच्या पर्यटनात घाटाचाही समावेश आहे. त्यामुळे हा घाट सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

दोन विभागांतील कोंडी

आंबोली घाट वन विभागाच्या हद्दीतून जातो. केवळ रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. रस्त्याच्या बाजूचे सगळे क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे दुरुस्ती करायची झाली तर वन विभागाची परवानगी लागते, जी सहसा मिळत नाही. घाट दुरुस्तीचा विषय आला की, हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवितात. यात दुरुस्तीचे काम मात्र रखडते. निकृष्ट कामाचा अनुभवही अनेकदा आला आहे. त्यामुळे घाटात कायमस्वरूपी ठोस उपाययोजना खऱ्या अर्थाने कधी मार्गी लागणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. वनखाते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न केला. मुळात एखादे बांधकाम आणि वनखाते यांचा दुरान्वयेही संबंध नाही. बांधकामाचे ज्ञान वनखात्याला नाही. त्यामुळे वनखात्याच्या हद्दीतील कामे आम्हीच करणार, या त्यांच्या भूमिकेमुळे आंबोली घाटमार्गाची खऱ्या अर्थाने वाट लागल्याचे सार्वजनिक बांधकाममधील अधिकारी खासगीत सांगतात. त्यामुळेच संरक्षक भिंती तसेच स्वित्झर्लंडची जाळी अशा तकलादू स्वरूपाच्या उपाययोजनांवरच सुरक्षेची भिस्त ठेवण्यात आली.

पर्यायी मार्गाचा इलाज

सव्वाशेहून अधिक वर्षे प्रवाशांची व माल वाहतुकीची सुखनैव वाहतूक करणारा आंबोली घाटमार्ग धोकादायक बनत चालल्याचा निष्कर्ष भारतीय भू-सर्वेक्षण विभागाच्या पथकाने आंबोली घाटाची पाहणी करून काढला होता. त्यामुळे भविष्यात हा घाटमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित राहिला नाही, हे निश्चित आहे. मुळात या घाटमार्गाचे रुंदीकरण हा पर्यायच ठरू शकत नाही. एकीकडे खोल दरी व दुसऱ्या बाजूला उंचच उंच कडे यामुळे रुंदीकरणाचा विचार करणे सोपे नाही. त्यामुळे दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललेल्या या घाटाला पर्यायी मार्ग शोधणे, हाच घाटमार्गाच्या दुखण्यावरील तुलनेत सोपा इलाज ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com