
कोल्हापूर : दोन वर्षांनंतर अंगणवाड्या झाल्या सुरू
कोल्हापूर - राज्यातील अंगणवाड्या तब्बल दोन वर्षांनंतर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार काल (ता. २९)पासून अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे राज्यातील अंगणवाड्या मार्च २०२० मध्ये बंद केल्या होत्या. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. सध्या मुलांना घरीच आहार दिला जातो. मात्र, १६ मेपासून अंगणवाडीत गरम व ताजा आहार द्यावा, असा आदेश आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे. विभागाकडून आहार पुरवठ्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार १६ मार्च ते १५ मे या दोन महिन्यांच्या कालावधीत तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी गरम ताजा आहाराऐवजी टीएचआर या घरपोच आहाराची मागणी फेडरेशनकडे नोंदवण्याबाबत सूचना आहेत. नागरी भागात ९ ऑगस्ट २०१९ च्या निविदेनुसार आहार पुरवठा करण्यासाठी महिला मंडळ, बचत गटांची निवड झाली आहे. त्यांच्यामार्फत गरम व ताजा आहार सुरु केला जाणार आहे. तर निविदा अटी शर्तीनुसार प्रत्यक्ष पुरवठा आदेश दिल्यापासून दोन वर्षांसाठी हे आहार पुरवठ्याचे काम देण्याच्या सूचना आहेत. तर ज्या ठिकाणी महिला मंडळ, बचत गटाची निवड झालेली नाही त्या ठिकाणी ज्यांचे मार्फत या निविदेपुर्वी आहार पुरवठा केला जात होता, त्यांच्यामार्फतच आहार पुरवठा सुरळित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
ज्या बचत गटांनी आहाराचे काम बंद केले आहे, त्या ठिकाणी कच्चे धान्य, किराणा मालाचा पुरवठा हा पर्यायी व्यवस्थेअतंगर्त करण्यात येत होता. आता यात बदल करुन कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा आदेश तात्पुरत्या स्वरुपात कंझ्युमर्स फेडरेशनकडून देण्यात यावा, असेही पत्रात म्हटले आहे.
सेविका, मदतनीस यांना सुटी
कोरोना काळात अंगणवाड्या बंद होत्या. मात्र, दोनच दिवसांपूर्वी अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व सुट्या पुढील काळात देणे शक्य नसल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे. परिणामी, मदतनीसांना २ ते ८ मे या कालावधीत सुटी दिली आहे; तर ९ ते १५ मे या कालावधीत अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुटी मंजूर केली आहे.