हातकणंगले तालुक्यातील बालिका खूनप्रकरणी सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी वकील उमेशचंद्र यादव

हातकणंगले तालुक्यातील बालिका खूनप्रकरणी सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती

मुंबई : हातकणंगले तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली. विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

संबधित बालिकेचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरदिवसा अपहरण झाले होते. त्याचदिवशी तिचा मृतदेह मिळून आला होता. तिच्यावर बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. शाखेने संशयित बंडा उर्फ प्रदीप पोवारला जेरबंद केले होते.

ॲड. यादव हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. ते राज्य शासनाच्या वतीने महत्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा सिटी लीमोझिंन घोटाळा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे कोपर्डी खून-बलात्कार प्रकरण, जवखेडे अहमदनगर येथील तिहेरी दलित हत्याकांड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जामखेड दुहेरी हत्याकांड, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरण, घाटकोपर येथील हिरे व्यापारी उदानी हत्याकांड, संगमनेर येथील व्यापारी गौतम हिरेन अपहरण-खून प्रकरण, रझा अकादमीच्या मोर्चा दरम्यान घडलेली मुंबईतील आझाद मैदान दंगल प्रकरण यांचा समावेश आहे.