esakal | चित्र, शिल्पाकृती प्रदर्शन व्हाया टेलिग्राम! देशभरातील कलाकारांचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र, शिल्पाकृती प्रदर्शन व्हाया टेलिग्राम!

चित्र, शिल्पाकृती प्रदर्शन व्हाया टेलिग्राम!

sakal_logo
By
- संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : दोन वर्षापूर्वी महापुराने हाहाकार माजवला आणि महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना हातभार देण्यासाठी राज्यभरातील चित्रकार व शिल्पकार मंडळी ‘आर्ट ऑफ ह्युमॅनिटी’ ग्रुपच्या नावाने एकवटली. कोल्हापूरबरोबरच पुणे आणि मुंबईत कलाकृती प्रदर्शने भरवून त्यातून मिळालेला निधी पूरग्रस्तांसाठी दिला गेला. सामाजिक बांधिलकी जपतानाच कलाकारांनी कलाकारांसाठी काय करता येईल, अशी संकल्पना पुढे आली आणि लॉकडाउनच्या काळात ‘माझ्या मते’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला.

व्हॉटस् ॲपवर सदस्य क्षमता कमी असल्याने टेलिग्रामच्या माध्यमातून चित्रकार व शिल्पकारांची ऑनलाईन प्रदर्शने होऊ लागली. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि आता तर देशभरातील अडीचशेहून अधिक चित्रकार, शिल्पकार, कला संग्राहक, गॅलरी व्यवस्थापक मंडळी या माध्यमातून एकत्र आली आहेत. प्रत्येक कलाकृतीवर मंथन करतानाच त्याचा त्यांना व्यावसायिकदृष्ट्याही फायदा होऊ लागला आहे.

कोरोना आणि त्यानंतरच्या सध्याचा अडचणींचा काळ पाहता अधिक प्रगल्भपणे एकत्रित राहून या काळावर मात करावी लागणार आहे, या भावनेतून ही संकल्पना पुढे आली. सुरवातीला ‘माझ्या मते' या नावाने एका दिवशी एका चित्रकाराचे ऑनलाईन प्रदर्शन होऊ लागले. हळूहळू ते तीन दिवसांवर आले आणि सोमवार ते बुधवार एका कलाकाराचे प्रदर्शन, गुरुवारी ग्रुपवर सामूहिक मंथन आणि शुक्रवार ते रविवारी दुसऱ्या कलाकाराचे प्रदर्शन अशी आठवड्याला दोन प्रदर्शने होऊ लागली आहेत आणि प्रत्येक कलाकृतीचे रसग्रहणही होऊ लागले आहे.

ग्रुपवर कलासंग्राहक, गॅलरी व्यवस्थापक, उत्तम कलारसिक, व्यावसायिक, आर्किटेक्टस्, इंटेरियर डिझाईनर्स आदी मंडळींना जोडले जाणार आहे. संकल्पना जगभरात अधिक व्यापक व्हावी, यासाठी ‘आर्ट फॉर ह्युमॅनिटी’ नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम व व्टिटर या प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाणार आहे. सध्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरपर्यंत सर्व दिवस ही ऑनलाईन गॅलरी बुक आहे.

हेही वाचा- स्वप्नीलच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार; भाजपचा आरोप

पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हणून सारी मंडळी दोन वर्षापूर्वी एकवटलो आणि प्रदर्शनांचे आयोजन करून पूरग्रस्तांना भरीव मदत देऊ शकलो. त्यानंतर मात्र या ग्रुपच्या माध्यमातून फारसे काम झाले नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात कलाकारांनी कलाकारांसाठी म्हणून ‘माझ्या मते’ ही नवी संकल्पना सुरू केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. काही कलाकारांच्या कलाकृती या माध्यमातून बुकिंगही झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यांच्यासाठी हा आधारही महत्त्‍वाचा ठरतो आहे.

- पार्श्वनाथ नांद्रे, चित्रकार

loading image